मुंबई : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचाराच्या निषेधार्थ गेट वे ऑफ इंडियावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या ठिकाणी आंदोलनाला कुठलीही परवानगी नसल्याचे कारण देत पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, या आंदोलनाला आझाद मैदानात हलवल्याची माहिती मिळत आहे.


या आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत होती. या ठिकाणी आंदोलन करण्याची परवानगी नाही. त्यामुळे तुम्ही इथं आंदोलन करू नका, असं आंदोलकांना वारंवार सांगण्यात आले होते. मात्र, तरीही आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते म्हणून आम्ही त्यांना आझाद मैदानात हलवल्याची माहिती पोलीसांनी दिली. दरम्यान, आंदोलकांना आम्ही ताब्यात घेतलं नसून त्यांना हलवण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली. आझाद मैदानात आंदोलन करण्याची कायदेशीर परवानगी असून त्याठिकाणी सर्व सुधिवा उपलब्ध असल्याचे पोलीसांनी सांगितले.

जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) हॉस्टेलमध्ये रविवारी (5 जानेवारी)रात्री मास्कधारी हल्लेखोरांनी हैदोस घातला. हल्लेखोरांनी लाठ्या-काठ्यांसह मुलींच्या हॉस्टेलवर हल्ला चढवला. हल्ल्यात जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोष गंभीर जखमी झाली आहे. रक्ताने माखलेले तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या 20 जणांना उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. या हल्ल्याचे पडसाद देशभरात उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील गेट वे ऑफ इंडियावर गेल्या दोन दिवसापासून आंदोलन सुरू होतं.

काय घडलं रविवारच्या रात्री -
राजधानी दिल्लीतील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी रात्री काही गुंडानी वसतीगृहात घुसून विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला केला. मास्कधारी गुंडांनी लाठ्या-काठ्या आणि लोखंडी सळईने मुलींवरही हल्ला केला. यात विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशा घोष गंभीर जखमी झाली आहे. या हल्ल्याचा देशभरातून निषेध होत आहे. जेएनयू विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. दोन मिनीट 10 सेकंदच्या या व्हिडीओत मुलींच्या वसतीगृहात तोंडाला बांधलेले गुंड तोडफोड आणि धिंगाणा घालताना दिसत आहेत. वसतीगृहात मुली आक्रोश करतायेत. एक तोंडाला रुमाल बांधलेला गुंड मुलींना धमकावण्याच प्रयत्न करताना दिसत आहे. या सर्वच गुंडांकडे लाठ्या, काठ्या आणि लोखंडी सळई होत्या.

संबंधित बातम्या :

JNU Attack | जेएनयूतील हल्ला पाहून 26/11ची आठवण झाली : मुख्यमंत्री

JNU Attack | हल्ल्यात जखमी झालेली जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोष कोण आहे?

JNU Protest | जेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या मारहाणीच्या निषेधार्थ मुंबई, पुण्यात आंदोलन | ABP MAJHA