मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चौदाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली. मनसेच्या या शॅडो कॅबिनेटवर सामना अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आली आहे. ‘शॅडो वाल्यांचे मुख्यमंत्रीपद रिकामेच’ अशा शब्दात 'सामना'तून मनसेच्या शॅडो कॅबिनेटची खिल्ली उडवण्यात आली आहे.


मनसे हा एकमेव आमदार असलेला पक्ष असून त्यांनी शॅडो कॅबिनेट बनवल्याचं सांगत यात त्याची खिल्लीही उडवण्यात आली आहे. शिवाय, शॅडो मुख्यमंत्री आणि शॅडो राज्यपालांची नेमणूकही व्हायला हवी होती, असा टोलाही 'सामना'तून लगावला आहे. शॅडो कॅबिनेटचा प्रयोग म्हणजे हा खेळ सावल्यांचा असा नाट्यप्रयोग ठरु नये, असं म्हणत असतानाच भाजप विरोधी पक्षात असला तरी सत्ताधाऱ्याच्या तोऱ्यात असल्याचा टोलाही लगावण्यात आला आहे.

तसेच शॅडो कॅबिनेटची घोषणा करताना त्यांच्या प्रमुख नेत्यांना छाया मंत्रिमंडळास तंबी द्यावी लागली की, ‘‘जपून करा, ब्लॅकमेल करण्याचे प्रकार करु नका.’’ हे बरे झाले, असं म्हणत मनसेवर टीका केली आहे.

साहेब लवकरच 'अयोध्ये'कडे कूच करावी लागणार : बाळा नांदगावकर



अग्रलेखात काय म्हटलंय ?

महाराष्ट्रातील घडामोडींमुळे देशातील राजकारणाला नवे वळण लागले आहे. त्यामुळे सगळ्यात मोठा पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष हा एका रात्रीत विरोधी पक्षाच्या बाकावर जाऊन बसला. भाजप विरोधी पक्ष झाला तरी अद्याप सत्ताधारी असल्याच्या तोऱ्यात वागत आहे. हे जरा गमतीचे वाटते.

संसदीय लोकशाहीत प्रबळ विरोधी पक्षाचे स्थान हे सत्ताधाऱ्यांच्या तोडीस तोड असते, पण विरोधी पक्षाच्या नेत्याचे स्थान आणि कार्य नेमके काय असते याबाबत आपल्याकडील राजकारण्यांचे अज्ञान आहे. त्यामुळेच राष्ट्रीय स्तरावर, राज्यस्तरांवरील विरोधी पक्ष ‘फुटकळ’ प्रयोग करीत असतो. अशा प्रयोगाने विरोधकांची प्रतिष्ठा कमी होते. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड अशा देशांतील संसदीय लोकशाहीत पंतप्रधानांइतकेच विरोधी पक्षाच्या नेत्यांचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.

संसदीय लोकशाहीचा तो अविभाज्य भाग आहे. किंबहुना त्याचे वर्णन ‘पर्यायी पंतप्रधान’ (प्रिटेंडर टू डू प्राइम मिनिस्टर्स थ्रोन) असेच केले जाते. लोकशाही व विरोधी पक्षाच्या बाबतीत हे घडाभर तेल ओतायचे कारण असे की, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळावर ‘नजर’ ठेवण्यासाठी एक ‘शॅडो कॅबिनेट’ एकमेव आमदार असलेल्या पक्षाने जाहीर केले आहे. हे ‘शॅडो’ मंत्रिमंडळ राज्यातील लोकनियुक्त मंत्रिमंडळाचे काय व कसे चालले आहे यावर म्हणे लक्ष ठेवील. सरकारच्या चुकीच्या कामकाजाचे वाभाडे काढण्यासाठी हे ‘शॅडो कॅबिनेट’ बनवले आहे असे संबंधित राजकीय पक्षातर्फे जाहीर केले आहे.

सरकारच्या चुका दाखवाच, पण सरकारकडून एखादे चांगले काम झाले असल्यास त्यांचे अभिनंदन करावे असेही सांगण्यात आले. मुळात अशा प्रकारचे ‘शॅडो कॅबिनेट’ कोणी तयार करावे? याबाबत काही संकेत आहेत. हा प्रयोग संसदेतील प्रमुख आणि प्रबळ विरोधी पक्षाने करायचा असतो. महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे व तिथे भाजप हा एक प्रबळ विरोधी पक्ष आहे. त्या 105 आमदारवाल्या पक्षाने ‘शॅडो’ मंत्रिमंडळ वगैरे बनवले नाही, पण एकमेव आमदारवाल्यांनी ‘शॅडो’ की काय ते बनवले.

जनाची नाही तर मनाची ठेवा, मनसेचा शिवसेनेला टोला