10 मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत 1101 विमानांमधील 1,29,448 प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी राज्यातील या तीन विमानतळांवर करण्यात येत आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महानगरपालिकांकडून आवश्यक मनुष्यबळ विमानतळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या शिवाय बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. ब्युरो ऑफ इमिग्रेशनद्वारे इराण, इटली आणि दक्षिण कोरियामधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशात सध्या कोरोनाचा संसंर्ग मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याने 21 फेब्रुवारी नंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकुण 591 प्रवासी आले आहेत.
पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या चारवर, कोरोनाग्रस्त दाम्पत्याच्या मुलीसह टॅक्सीचालकही पॉझिटिव्ह
राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये 502 खाटांची व्यवस्था
तर, 18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 304 जणांना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी 289 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर पाच जण पॉझिटिव्ह आले आहेत. आजवर भरती झालेल्या 304 प्रवाशांपैकी 289 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या 12 जण पुणे येथे तर तीन जण मुंबईत भरती आहेत. नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले असून राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये 502 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोल्हापूर कोरोनाशी लढण्यासाठी सज्ज
मुंबई, पुण्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातही अनेक नागरिक परदेशातून येत आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासनही सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय. परदेशातून भारतात आलेल्या नागरिकांना 14 दिवस दक्षतेखाली ठेवण्यात येणार आहे. एकूण 16 नागरिक परदेशातून कोल्हापूर जिल्ह्यात आले आहेत. जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा एकही संशयित नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र स्वतःची काळजी घरापासूनच घ्यावी, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. जिल्ह्याता कोरोना रुग्णांसाठी 48 बेडची व्यवस्था सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आहे. एखादा संशयित आढळला तरी खासगी रुग्णालयांनी सरकारी यंत्रणेला त्याची माहिती देण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे. चुकून एखादा पिझिटिव्ह रुग्ण आढळला आणि त्याची माहिती लपवली तर गुन्हा दाखल करू. प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याने आपआपल्या मुख्यालयात उपस्थित राहणं गरजेचं आहे. जादा दराने मास्कची विक्री केल्यास मेडिकल दुकानांवर कारवाई करू, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय.
CoronaVirus Update | कोरोना संक्रमित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी होणार : राजेश टोपे