मुंबई : येत्या काही महिन्यांमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत, परंतु त्याआधी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांच्या जवळ असलेल्या लोकांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीच्या आधी शिवसेनेच्या आर्थिक नाड्या आवळल्या जात आहेत का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले अनिल परब, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, आदित्य ठाकरे यांचे मित्र राहुल कनाल, आमदार रवींद्र वायकर, त्यानंतर मेहुणे श्रीधर पाटणकर आणि त्यांचे साथीदार नंदकिशोर चतुर्वेदी...गेल्या काही दिवसांपासून मातोश्रीशी संबंधित असलेल्या या लोकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकापाठोपाठ एक केंद्रीय यंत्रणांकडून धाडसत्र सुरु आहे आणि मुंबई महापालिकेच्या तोंडावर ही कारवाई सुरु झाली आहे का? याची चर्चा रंगली.


25 वर्षातील मुंबईकरांचा पैसा आता समोर येत आहे. कोण सेल कंपन्या चालवत होतो. सोनं खरेदी करत होते ते आता समोर येत आहे, अशी टीका भाजप आमदार अमित साटम यांनी केला.


उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पूर्वी अखिलेश यादव यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई केल्याची टीका झाली. यूपीतील अत्तर व्यापारी पियूष जैन यांच्या कानपूर येथील घरी आणि कार्यालयात आयकर विभागाने कारवाई केली. ज्यात तब्बल 177 कोटी 45 लाख रोख आणि सोने-चांदी जप्त केली. विशेष म्हणजे ही कारवाई तीन दिवस सुरु होती.


केंद्रीय यंत्रणांकडून सुरु असलेल्या कारवाईवर नजर टाकली तर उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय टार्गेटवर असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे शिवसेनेच्या आर्थिक नाड्या असल्याचं बोललं जातं, त्या शिलेदारावर कारवाई होत आहे. त्यातलं सगळ्यात आघाडीचे नाव म्हणजे यशवंत जाधव.


अनिल परब
उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी, परिवहन आणि संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांचं नाव समोर आल्यानंतर ईडीने त्यांची चौकशी केली. दापोलीत अनधिकृत रेसॉर्ट बांधल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. यासंदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे त्यांनी लेखी तक्रार केली आहे. या प्रकरणी अनिल परब यांच्यावर कारवाई होणार असा दावाही सोमय्या यांनी केला


यशवंत जाधव
शिवसेनेचे मुंबई महापालिकेत नेते आहेत,  स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेल्या यशवंत जाधव यांच्या घरावर 25 फेब्रुवारी रोजी सकाळी आयकर विभागाने छापे मारले. कोविड काळातला भ्रष्टाचार, शेल कंपन्यांद्वारे केलेली गुंतवणूक यासाठी आयकर विभागाने ही छापेमारी केली. मुंबईत सुमारे 36 मालमत्तांची खरेदी केल्या ज्याची किंमत 130 कोटीहून अधिक असल्याची माहिती आहे.


रविंद्र वायकर 
उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आहेत. अवैधरित्या अलिबागमध्ये बंगले खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अलिबागमधील कोलई गावात अन्वय नाईक यांच्याकडून जमिनीचे करार करण्यात आले. रश्मी ठाकरे देखील त्यात सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला.


राहुल कनाल
युवासेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य राहुल कनाल यांच्या मुंबईतील वांद्रे येथील घरावर आयकर विभागानं छापा मारला होता. राहुल कनाल हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. राहुल कनाल हे सध्या शिर्डी संस्थानच्या विश्वस्तपदी आहेत, मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचेही ते सदस्य आहेत.


ठाण्यात हिरानंदानी ग्रुप 
या ग्रुपवर आयकर विभागाने छापा टाकल्याचे समोर आले आहे. कोट्यवधी रुपयांच्या कर चोरी प्रकरणी धाडी टाकण्यात आल्या आहेत.  रियल इस्टेटमध्ये काळा पैसा गुंतवल्याचा आयकर विभागाला संशय आहे. हिरानंदानी ग्रुपवर छापा टाकल्यामुळे बांधकाम क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. हा ग्रुप महाविकास आघाडीच्या जवळ असल्याचं बोललं जातं


पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपैकी चार राज्यात भाजपने बाजी मारली. यामुळे मुंबई महापालिकेसाठी भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. मिशन मुंबई जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीपूर्वी अखिलेश यादव यांच्या निकटवर्तीयांवर छापेमारी करुन आर्थिक नाड्या आवळल्या, असा भाजपवर आरोप झाला. आता मुंबई महापालिका निवडणूक आणि या कारवाया हा निव्वळ योगायोग आहे की नवा पॅटर्न? याची चर्चा सुरु झाली आहे.