Shivsena Dasara Melava 2023 : शिवसेनेच्या दसरा मेळव्याच्या माध्यमातून आज शिंदे गटाची तोफ धडाडणार असून एकनाथ शिंदे यांच्याशिवाय चार प्रमुख नेते भाषण करणार आहेत. या चार नेत्यांची यादी शिंदे गटाने जाहीर केली असून हे चार नेते आज उद्धव ठाकरे यांच्यावर तुटून पडणार आहेत. रामदास कदम, गुलाबराव पाटील, शहाजी बापू पाटील आणि ज्योती वाघमारे अशी या चार नेत्यांची नावे आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा आझाद मैदानावर आज दसरा मेळावा होत असून त्यासाठी राज्यातल्या कानाकोपऱ्यातून लोक येत आहेत. काही वेळामध्येच कार्यक्रमाला सुरूवात होईल. एकनाथ शिंदे यांचे भाषण साधारणपणे 9 वाजता करतील अशी माहिती आहे. पण त्याआधी जे नेते भाषण करणार आहेत त्यांची नावं समोर आली आहेत.
शिंदे गटाकडून रामदास कदम यांनी नेहमीच उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाशी गद्दारी केली असल्याची टीका त्यांच्यावर कायम केली जात आहे. तसेच शिंदे गटाची मुलूखमैदान तोफ अशी ओळख असलेले शहाजी बापू पाटीलही आज भाषण करणार आहेत.
गुलाबराव पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते आणि वक्ते आहेत. त्यांची भाषणाची वेगळी स्टाईल असून त्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत उद्धव ठाकरे गटावर चांगलंच तोंडसूख घेतलंय. आजही आझाद मैदानावरून त्यांना भाषणाची संधी मिळणार आहे. त्याचसोबत ज्योती वाघमारे या देखील आज भाषण करणार आहेत.
बाळासाहेबांची ती खुर्ची स्टेजवर
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात गेल्या वर्षीप्रमाणं बाळासाहेबांची खुर्ची मंचावर ठेवली जाणार आहे. याच खुर्चीवरून बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्यात 2012 साली शेवटचे भाषण केले होते. ती खुर्ची आठवण म्हणून ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे कलादालनात ठेवण्यात आली होती. गेल्या वर्षी एमएमआरडीए मैदानात झालेल्या दसरा मेळाव्यात हीच खुर्ची ठेवण्यात आली होती. याही वर्षी बाळासाहेबांची आठवण म्हणून ही खुर्ची ठेवली जाणार आहे. त्या माध्यमातून शिवसैनिकांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे याच खुर्चीत बसून बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या उद्धवला सांभाळा असे भावनिक आवाहन शिवसैनिकांकडे केले होते.
ही बातमी वाचा: