Shiv Sena On Dilip Walse Patil : शिवसेना गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती आहे.  राष्ट्रवादीकडे असलेलं  गृहखातं सेनेला मिळावं, अशी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची भावना आहे. गृहखातं भाजपबद्दल सॉफ्ट असल्यानं शिवसेनेची तीव्र नाराजी असल्याची माहिती मिळत आहे. 
 
भाजपच्या नेत्यांवर कारवाई करण्यात गृहखातं कमी पडत असल्याची शिवसेनेची भावना आहे. प्रवीण दरेकर आणि किरीट सोमय्या प्रकरणात कारवाई न झाल्यानं शिवसेनेची नाराजी असल्याचं बोललं जात आहे. किरीट सोमय्या, प्रवीण दरेकर यांच्यावर गंभीर आरोप होऊनही कुठलीही कारवाई न झाल्यानं शिवसेनेचे नेते नाराज आहेत.


या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आज दुपारी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. गेले काही दिवस महाविकास आघाडीतले अनेक नेते गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही नाराजी बोलूनही दाखवली आहे. त्यानंतर वळसे-पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला येत आहेत. थोड्याच वेळात वर्षा निवासस्थानी दोघांची भेट होणार असल्याची माहिती आहे. 


संजय राऊतांनी आज नेमकं काय म्हटलं...
आज संजय राऊतांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्यात  ईडीची कारवाई हे गृहखात्यावरचं आक्रमण आहे असं वक्तव्य आज संजय राऊतांनी केलं. त्यांचं हे वक्तव्य राष्ट्रवादीला उद्देशून होतं का? अशा राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. राऊतांनी म्हटलं की,  गृहखात्याने अधिक सक्षम आणि कठोर होणे गरजेचे आहे. ज्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणा घुसतात. हे खरंतर गृह खात्यावरचं आक्रमण आहे.  


शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये एक्स्चेंजची वेळ आली आहे का?


भाजप नेते सुधीर मुनगंटीवार एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडीची अडीच वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये एक्स्चेंजची वेळ आली आहे का? म्हणजे राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद आणि शिवसेनेकडे गृहमंत्रीपद असा काही विचार सुरू आहे का? असं ते म्हणाले. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha