Sanjay Raut : राज्याच्या गृहखात्याला आता कठोर पावलं उचलावी लागतील, नाहीतर तुम्ही तुमच्यासाठी रोज एक नवीन खड्डा खोदत आहात असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. ईडीचा तपास हा राज्याच्या गृहखात्यावरचे आक्रमण असल्याचे राऊत म्हणाले. त्यामुळं महाराष्ट्राच्या पोलिसांना जर काही सुचना मिळाल्या, काही मार्गदर्शन मिळाले तर काम होऊ शकेल. त्यासाठी गृहखात्यानं अधिक सक्षम आणि कठोर होणं गरजेचं असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. 


ज्या प्रकारे जम्मू काश्मीरमध्ये किंवा नॉर्थ इस्टमध्ये अचानक अतिरेकी घुसतात. बॉम्ब हल्ले करतात आणि निघून जातात त्याचप्रकारे या कारवाया सुरु असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. यातून संघर्ष झाला तर केंद्र आणि राज्य यांच्यात मोठा संघर्ष होऊ शकतो. म्हणूनच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बिगर भाजपशासीत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. ते पत्र याच भूमिकेतून लिहले आहे की, ज्याप्रकारे ईडी, सीबीआयचा देशात गैरप्रकार चालू आहे, त्याविरोधात सर्वांनी एकत्र यायला हवं असे राऊत यावेळी म्हणाले. आता पाकिट मारणाऱ्यांचा तपास करणेच ईडीकडून बाकी असल्याचा टोलाही राऊतांनी लगावला.


दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझी चर्चा झाल्याचे राऊत म्हणाले. केंद्रीय यंत्रणा ज्या प्रकार महाराष्ट्रात घुसत आहेत, हे महाराष्ट्राच्या गृहखात्यावरचे आक्रमण असल्याचे राऊत म्हणाले. आस्ते कदम भूमिका जर कोणी घेत असेल तर ते स्वत: साठी फाशीचा दोर ओवत असल्याचे राऊत म्हणाले. त्यामुळं गृहखात्याला दमदार पावलं टाकावी लागतील. नाहीतर रोज तुम्ही तुमच्यासाठी एक नवीन खड्डा खोदत असल्याचे राऊत म्हणाले. 


यावेळी बोलताना राऊत यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. सरकारने जनतेशी बांधिलकी ठेवली पाहिजे, थापा मारणे, फसवा फसवी बंद केली पाहिजे. लोकांच्या जगण्या मरण्याचे प्रश्न गंभीर होत चालले असल्याचे राऊत म्हणाले. अच्छे दिन हे एप्रिल फुलच आहे असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला. खात्यामध्ये 15 लाख रुपये येतील याची लोक गेल्या 7 वर्षापासून वाट बघत आहेत.  2 कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देणार हे एप्रिल फुलच, पाकव्याप्त कश्मीर हे हिंदुस्थानमध्ये येणार हे एप्रिल फुलच असल्याचे राऊत म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या: