मुंबई : पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ गोरेगाव फिल्मसिटी दोन तासांसाठी बंद ठेवण्यात आली. दुपारी 2 ते 4 या दोन तासांसाठी चित्रीकरण बंद ठेवण्यात आलं. यावेळी पाकिस्तानी कलाकाराला कोणत्याही चित्रपटात घेतलं तर त्याचं शूटिंग होऊ दिलं जाणार नाही. तसेच कोणत्याही म्यूझिक कंपनीनं पाकिस्तानी गायकाला घेतलं तर गाणं रिलीज होऊ दिलं जाणार नाही, असा इशारा फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने दिला आहे. यावेळी कलाकारांसह क्रिकेटर हरभजन, सहवाग, रैना, कैफ यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला.

पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये स्थान देऊ नये, असे मनचिसेने म्हटले आहे.  उरी हल्ल्यानंतर मनसेने पाकिस्तानी कलाकारांना 48/ तासांचा इशारा देताच सर्व कलाकार पाकिस्तानात परतले. आता पुन्हा भारतात पाकिस्तानी कलाकारांना संधी देण्यासाठी काही जण सक्रिय झाले आहेत. पाकिस्तानी कलाकारांना संधी दिलीत तर गाठ मनसेशी आहे, असा इशारा मनचिसेचे अमेय खोपकर यांनी दिला आहे.

पाकिस्तानी गायकांशी कोणताही करार करू नका, असा इशारा राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आघाडीच्या संगीत कंपन्यांना दिली आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ही माहिती दिली. टी-सीरीज, सोनी म्युझिक, व्हीनस, टिप्स म्युझिक सारख्या कंपन्यांना आम्ही देशातील जनतेच्या भावना कळवल्या आहेत. या कंपन्यांनी पाकिस्तानी गायकांसोबत काम करणं ताबडतोब थांबवलं पाहिजे. तसं न झाल्यास आम्ही आमच्या पद्धतीनं कारवाई करू, असं खोपकर यांनी स्पष्ट केलं आहे. भूषण कुमार यांच्या टी-सीरिजनं अलीकडंच राहत फतेह अली खान व आतिफ अस्लम यांच्याशी दोन गाण्यांसाठी करार केला आहे. मात्र, मनसेच्या इशाऱ्यानंतर कंपनीनं यू-ट्यूब चॅनेलवरून त्यांची गाणी तात्काळ हटवली आहेत.

तर  कोणत्याही पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडकरांनी संधी देवू नये असा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही दिला आहे.