Sheetal Mhatre Viral Video : शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणात दहिसर पोलिसांनी (Dahisar Police) कल्याणच्या (Kalyan) तिसगाव परिसरातून विनायक डायरे या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. विनायक डायरे हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोशल मीडिया सेल कार्यकर्ता आहे. परंतु यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप विनायक डायरेच्या कुटुंबियांनी केला. नावं सांगूनही पोलीस तक्रार दाखल करुन घेत नसल्याचा दावा करत, कुटुंबियांसह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून घोषणाबाजी केली.


शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत शीतल म्हात्रे यांनी आपला व्हिडीओ मॉर्फ करुन व्हायरल केल्याचा आरोप केला आहे. तसंच दहिसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.


या प्रकरणात दहिसर पोलिसांनी कल्याणच्या तिसगाव परिसरातून विनायक डायरे नावाच्या तरुणाला ताब्यात घेतलं. हा तरुण ठाकरे गटाच्या सोशल मीडिया सेलचं काम पाहतो. शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी याआधीच दोन जणांना अटक केली आहे. मानस कुवर आणि अशोक मिश्रा अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावं आहेत.


शिवसेना कार्यकर्त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली, तरुणाच्या कुटुंबाचा आरोप


परंतु यानंतर संबंधित तरुणाच्या कुटुंबियांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेचे तीन कार्यकर्ते सायंकाळच्या सुमारास घरी आले आणि त्यांनी विनायक डायरेसह कुटुंबातील सगळ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप कुटुंबाने केला आहे. याबाबत डायरे कुटुंबाने धमकी देणाऱ्यांविरोधात तक्रार देण्यासाठी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी धमकी देणाऱ्यांची नावे सांगत तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र नावं सांगून पण पोलीस त्यांच्याविरोधात तक्रार घेत असल्याचा आरोप डायरे कुटुंबांनी केला. याविरोधात रात्री दोनच्या सुमारास ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात ठाण मांडून ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली. घरात घुसून धमकावणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी कार्यकर्ते तसंच पदाधिकाऱ्यांनी केली आहे.


काय आहे प्रकरण?


गोरेगाव इथे शनिवारी (11 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅली शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये शीतल म्हात्रे या जीपमध्ये असताना त्यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ हा मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला. बदनामी करण्यासाठी हा व्हिडीओ मॉर्फ करुन ठाकरे गट आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तो व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला. या प्रकरणी शीतल म्हात्रे यांनी रविवारी पहाटे दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.


संबंधित बातमी


Sheetal Mhatre : ठाकरे गटाच्या आयटी सेलकडून व्हिडीओ व्हायरल, शीतल म्हात्रेंचा आरोप