मुंबई : मुंबई महानगरासह मुंबई प्रदेशात अत्यंत मोठ्या प्रमाणावर होत असलेली विकास कामे, बांधकामे यासह हवेतील बदलामुळे हवेचा गुणवत्ता स्तर सध्या खालावला आहे. ही बाब लक्षात घेता प्रदूषणासाठी धूळ हा घटक कारणीभूत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने सात दिवसात अहवाल सादर करावा आणि त्या आधारे दिनांक 1 एप्रिल 2023 पासून बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation ) क्षेत्रात उपाययोजनांची तातडीने सक्त अंमलबजावणी सुरू करण्यात येईल, त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर बांधकाम रोखण्यासह इतर कठोर कारवाई केली जाईल, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील हवा प्रदूषण नियंत्रण, मुंबई सुशोभीकरण प्रकल्प आणि मार्च 2023 अखेर मुंबईत नियोजित जी20 परिषदेची बैठक या पार्श्वभूमीवर महानगरपालिका डॉ. इकबाल सिंह चहल यांनी ऑनलाईन पद्धतीने आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले आहे.
महानगरपालिका आयुक्तांनी दिलेले निर्देश
1) मुंबईतील हवा प्रदूषण नियंत्रणासाठी कृती
मुंबई महानगरात यापूर्वी कधीही नव्हती, अशी हवा प्रदूषण स्थिती निर्माण झाली आहे. कोरोना काळानंतर मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली बांधकामे तसेच विविध विकास कामे यातून निर्माण होणारी धूळ, शिवाय हवेच्या स्थितीमध्ये आणि वेगामध्ये झालेले बदल हे दोन प्रमुख घटक आढळले आहेत. नैसर्गिक स्थिती मानवी नियंत्रणाबाहेर असली तरी मुंबईत सध्या सुमारे पाच हजारपेक्षा अधिक ठिकाणी विविध कामे सुरू आहेत. त्यामुळे या कामातून निर्माण होणारी धूळ अटकाव करणे आपल्या हातात आहे. त्यामुळे विविध बांधकामे आणि विकास कामांच्या ठिकाणाहून निर्माण होणारी धूळ नियंत्रित करण्यासाठीच्या उपाययोजना, सर्व संबंधित भागधारकांना त्याविषयी सूचना देऊन उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची पद्धती आणि उपाययोजना, नियम व सूचना यांचे उल्लंघन केल्यास करावयाची कठोर कारवाई या तीन पैलूंवर सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची समिती गठीत करण्यात येत आहे.
या समितीत सदस्य म्हणून उपआयुक्त (पर्यावरण), उपआयुक्त (पायाभूत सुविधा), उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन), प्रमुख अभियंता (विकास नियोजन), महानगरपालिका आयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी कार्यकारी अभियंता सतीश गीते आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नामनिर्देशित सदस्य अशा सहा जणांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
या समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात धूळ नियंत्रणाची अंतिम कार्यपद्धती निश्चित करून 1 एप्रिल 2023 पासून लागू केली जाईल. या कार्यपद्धतीचे अथवा कोणत्याही नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांना सूचना देऊन काम थांबवणे व इतर कठोर कारवाई देखील केली जाईल, असे देखील आयुक्तांनी म्हटले आहे.
2) मुंबई सुशोभीकरण प्रकल्प
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबई सुशोभीकरण प्रकल्प हा विशेष प्रकल्प सध्या राबविण्यात येत आहे. डिसेंबर 2022 मध्ये पहिल्या टप्प्यात हाती घेतलेली 500 कामे आता पूर्णत्वाकडे येत आहेत. तर दुसऱ्या टप्प्यातील 320 कामांना देखील प्रारंभ झाला आहे. या सर्व कामांचा संबंधित परिमंडळाचे, विभागांचे व खात्यांचे सहआयुक्त/ उपायुक्त, सर्व सहायक आयुक्त यांनी आढावा घेऊन काम पूर्ण करण्याचे वेळापत्रक तयार करावे, कामांना अधिकाधिक गती द्यावी, विद्युत दिवे आणि पदपथ सुशोभीकरणासारखी कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश आयुक्तांनी दिले.
2) जी20 परिषदेच्या येत्या बैठकीसाठी पूर्वतयारी
मुंबईमध्ये 28 ते 30 मार्च 2023 दरम्यान जी20 परिषदेची व्यापार आणि वित्त गटाची बैठक नियोजित आहे. डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या जी20 परिषदेच्या पहिल्या बैठकीप्रमाणेच याही बैठकीची बहुतांश ठिकाणे आणि पाहुण्यांची निवास व्यवस्था असणारी हॉटेल्स कायम आहेत. त्यामुळे मागील अनुभव लक्षात घेता सर्व संबंधित मार्गांवर रस्ते देखभाल आणि इतर आवश्यक कामे वेळेत पूर्ण करावीत. अभ्यागतांसाठी वैद्यकीय सुविधा आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवेची उपलब्धता राहील याची काळजी घ्यावी, आदी सूचना देखील आयुक्तांनी केल्या आहेत.