मुंबई : एका बाजूला अमेरिकेच्या अध्यक्षांचे स्वागत केले जाते आणि दुसऱ्या बाजूला भारताच्या एका वर्गावर हल्ले केले जातात. केंद्रातील सत्ताधारी हे एका सांप्रदायिक विचाराने समाजात तेढ निर्माण करून त्याचा राजकीय फायदा करून घेत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज केला. ते मुंबईत आयोजित राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, राज्यकर्ते जर चुकीचे वागायला लागले, राज्यकर्तेच दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करत असतील तर वेगळी परिस्थिती निर्माण होईल. दिल्लीत कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही केंद्राकडे असते. त्यामुळे दिल्लीत जे घडले त्याची पूर्ण जबाबदारी ही केंद्राची आहे, असा आरोप शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर केला आहे.


शरद पवार यावेळी म्हणाले की, देशाच्या राजधानीला आग लागली आहे. दिल्ली शहरात समाजात फूट पडून विषारी वातावरण तयार केलं आहे. निवडणूक झाल्यानंतर पंतप्रधान, गृहमंत्री, इतर मंत्र्यांचा रोख हा देशाच्या सामाजिक धार्मिक ऐक्याला छेद देणार होता. यांचा मंत्री म्हणतो गोळी मारा. सत्ता ही रक्षण करण्यासाठी असते तर दुसरीकडे यांचे मंत्री असं बोलतात. दिल्लीत शाळा उध्वस्त केल्या, शैक्षणिक संस्थांना आग लावली गेली. जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेचा राष्ट्रपती दिल्लीत येतो आणि त्याचवेळी एक वर्गावर हल्ला होतो, असं पवार म्हणाले.

राष्ट्रवादीचं 'मिशन 2022'; मुंबई महापालिकेत 8 चे 60 नगरसेवक झाले पाहिजेत : अजित पवार


आज दिल्लीची अवस्था बघा, सगळ्या प्रदेशातून लोकं इथं येऊन राहतात. सांप्रदायिक विचाराने राजकारण करण्याचा पाडाव दिल्लीच्या नागरिकांनी केला. भाजपला सत्तेपासून लांब ठेवलं यासाठी दिल्लीकरांचे अभिनंदन करायला हवं. आपल्याला हवं ते होत नाही हे दिसल्यावर दिल्लीत आग लावण्याची, दगडफेक करण्याची सुरुवात केली. त्याच्यामागे सत्ताधारी पक्ष आहे. धर्म आणि जातीचा आधार घेऊन समाजात फूट पडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं यावेळी शरद पवार म्हणाले.

NCP Preparation for BMC 2022 | मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या तयारीला सुरुवात

दिल्लीत विविध पक्षाचे लोक राष्ट्रपतींना भेटले. दिल्लीत घडते त्याची 100 टक्के जबादारी केंद्र सरकारकडे आहे. हे असताना दिल्लीत हे चित्र आहे. बेरोजगारांची संख्या वाढत आहे. कारखाने बंद पडत आहेत. आशादायी चित्र करण्याऐवजी ज्या पक्षाला 300 पेक्षा जास्त जागा मिळाल्या त्या पक्षाचं आज दिल्लीत सरकार आलं नाही. अनेक राज्यात सत्ताबदल झाले आहेत. लोकसभेनंतर अनेक राज्यात बदल घडले आहेत. जिथे अन्याय, अत्याचार होतील. जातीयवाद, धार्मिक वाद केला जाईल. अशा ठिकाणी अशा शक्तींना बाजूला केलं पाहिजे, असं ते म्हणाले.

शरद पवार यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
- अन्य पक्षाना बरोबर घेतलं पाहिजे
- महाराष्ट्रात निवडणूक झाल्या. लोकांनी पाठिंबा दिला. पण मुंबईत संघटना वाढवली पाहिजे
- नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. सगळ्यांना बरोबर घेऊन पक्ष चालवला पाहिजे
- एकमेकांचा विस्तार कसा होईल हा विचार केला पाहिजे
- सत्तेसाठी नाही, हे राज्य पुढे कसं नेता येईल यासाठी हे सरकार काम करत आहे
- हे सरकार पाच वर्षे 100 टक्के चालेल याबाबत माझ्या मनात शंका नाही