मुंबई : मुंबईतील कोविड प्रादुर्भावासंदर्भातील सेरो सर्वेक्षणाचा दुसऱ्या फेरीचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.  पहिल्या फेरीच्या तुलनेत झोपडपट्टीतील अॅन्टिबॉडीजची पातळी घसरली तर बिगर झोपडपट्टी भागांतील अॅन्टिबॉडीज प्राबल्यात किंचीत वाढ झाली आहे.  पहिल्या फेरीच्या तुलनेत दुसऱ्या फेरीत झोपडपट्टी परिसरातील संसर्गात काही प्रमाणात घट तर, बिगर झोपडपट्टी क्षेत्रातील संसर्गात वाढ झाल्याचे या सर्वेक्षणातून समोर आहे.  मात्र, दुसऱ्या फेरीतही इमारतींपेक्षा झोपडपट्टी परिसरात अॅन्टीबॉडीजचे प्रमाण अधिकच असल्याचे निदर्शनास आले आहे.


दुसऱ्या फेरीतील निष्कर्षानुसार झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे 45 टक्के अॅन्टीबॉडीज तर बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे 18 टक्के अॅन्टीबॉडीजचे प्रमाण वाढलं आहे.  पहिल्या फेरीतील सर्वेक्षणानुसार झोपडपट्टी भागांमध्ये 57 टक्के आणि बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे 16 टक्के अॅन्टीबॉडीज प्राबल्य आढळून आलं होत्या. सर्वेक्षणाच्या दोन्ही फेऱ्यांमध्ये अॅन्टीबॉडीज प्राबल्य हे पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये किंचितसे अधिक आढळून आले आहे.


मात्र, पहिल्या फेरी दरम्यान सर्व वयोगटांमध्ये अॅन्टिबॉडीजचे समान प्राबल्य असल्याचे आढळले होते, तर दुसऱ्या फेरी दरम्यान हे प्राबल्य 40 पेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींमध्ये काही प्रमाणात अधिक असल्याचे आढळून आले आहे. सर्वेक्षणाच्या दोन्ही फेऱ्यांदरम्यान आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिंमध्ये (Health Care Workers) सरासरी 27 टक्के एवढे अॅन्टीबॉडीज प्राबल्य आढळून आले आहे.


सेरो सर्व्हेची दुसरी फेरी ही आर/उत्तर, एम/पश्चिम आणि एफ/उत्तर याच तीन विभागात सप्टेंबर अखेरीस करण्यात आली होती. या दुसऱ्या फेरी अंतर्गत 5 हजार 384 नमूने संकलित करण्यात आले.


काय आहे सेरो सर्वेक्षण


मुंबईमध्ये ‘सार्स-कोविड 2’ संसर्गाच्या अनुषंगाने, रक्त नमुने घेऊन करावयाचे सर्वेक्षण अर्थात सेरोलॉजिकल सर्वेलन्साचा उपक्रम नीती आयोग, मुंबई महानगरपालिका, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (मुंबई) यांच्याद्वारे संयुक्तरित्या राबविण्यात येतोय.


या सर्वेक्षणाच्या माध्यमातून अभ्यास करताना कस्तुरबा रेणूजीवशास्त्र वैद्यकीय प्रयोगशाळा, ट्रांसलेशनल स्वास्थ्य विज्ञान एवं प्रौद्योगिकी संस्थान (Translational Health Science and Technology Institute), ए.टी.ई. चंद्रा फाऊंडेशन आणि आय.डी.एफ.सी. इन्स्टिट्यूट हे देखील त्यामध्ये सहयोगी संस्था म्हणून सहभागी आहेत.


भारतातील एक व्यापक अवछेदी सर्वेक्षण (क्रॉस-सेक्शनल सर्वे) म्हणून या अभ्यासाचे उद्दिष्ट नागरिकांमध्ये असलेल्या रक्तातील प्रतिद्रव्या्चे (ऍन्टी्बॉडीज) प्राबल्य जाणून घेणे हे होते.


यासाठी नमूना निवड पध्दतीनुसार (Random Sampling) नमुने संकलित करण्यात आले. त्यात सर्वसाधारण लोकसंख्येचे वय आणि लिंग यातील स्तरानुसार, तसेच आरोग्य कर्मचारी यांचे नमुने घेऊन या साथ आजाराचा फैलाव कसा झाला, त्याचा अभ्यारस करण्यासाठी दोन फे-यांद्वारे सर्वेक्षण घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. यापैकी सर्वेक्षणाची पहिली फेरी ही जुलै महिन्याच्या अखेरीस घेण्यात आली होती. आता याच संशोधनांतर्गत दुस-या फेरीतील सर्वेक्षण करण्यात आले आहे.


पहिल्या फेरीमध्ये अंदाजित केलेल्या 8 हजार 887 पैकी एकूण 6 हजार 936 नमुने संकलित करण्यात आले होते. झोपडपट्टी आणि बिगर झोपडपट्टी परिसर मिळून आर/उत्तर, एम/पश्चिम आणि एफ/उत्तर या ३ विभागांमध्ये सर्वसाधारण लोकसंख्येतून हे नमुने संकलित करण्यात आले होते. सर्वेक्षणात सहभागी व्यक्तींची स्वच्छेने संमती प्राप्त करून त्यांना सहभागी करून घेण्यात आले होते. यामध्ये अबॉट कंपनीच्या क्लिया पद्धतीचा उपयोग करून अँटी सार्सकोविड आयजीजी ॲण्टीबॉडीची पडताळणी करण्यात आली.


सर्वेक्षणाच्या दुस-या फेरी अंतर्गत आर/उत्तर, एम/पश्चिम आणि एफ/उत्तर याच तीन विभागात सदर सर्वे सप्टेंबर अखेरीस करण्यात आला. या दुसऱ्या फेरी अंतर्गत अंदाजित केलेल्यात 5 हजार 840 एवढ्या लक्ष्य नमुन्यांपैकी 5 हजार 384 नमूने संकलित करण्यात आले. हे नमूने संकलित करण्यासाठी 728 व्यक्ती कार्यरत होत्या.


दुसऱ्या फेरीतील सर्वेक्षणामध्ये लक्षणे असलेल्या, बरे झालेल्या किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींचा समावेश होता. तसेच संस्थात्माक विलगीकरणात असलेल्या आणि सक्रीय प्रतिबंधात्मक क्षेत्रातील व्यक्तींना या अभ्यासातून वगळण्यात आले. एकूण नमून्यांपैकी साधारणपणे एक ते दोन टक्के नमूने हे गेल्या फेरीत सहभागी झालेल्या व्यक्तीचेही होते.


दुसऱ्या फेरीतील सर्वेक्षणाचे परिणाम 
दुसऱ्या फेरीतील सर्वेक्षणाचे परिणाम असे दर्शवतात की, झोपडपट्टी परिसरातील नमून्यांमध्ये आढळून आलेले अॅन्टीबॉडीजचे प्राबल्य आणि बाधित रुग्णांची संख्या (Reported Cases) याचा अभ्यास केल्यास झोपडपट्टी परिसरातील संसर्गात काही प्रमाणात घट झाली आहे. पहिल्या फेरीतील सर्वेक्षणाच्या तुलनेत दुसऱ्या फेरी दरम्यान बिगर झोपडपट्टी परिसरांमध्ये आंशिक वाढ नोंदविण्याात आली आहे. झोपडपट्टी परिसरातील लोकसंख्येमध्ये आढळून आलेल्या अॅन्टीबॉडीज प्राबल्याच्या टक्केवारीच्या तुलनेत त्याच परिसरातील काम करणा-या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये अॅन्टीबॉडीजचे प्राबल्य तुलनेने कमी असल्याचे आढळून आलेले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे मास्कचा करण्यात येत असलेल्या सुयोग्य वापर आणि हातांची करण्यात येत असलेली नियमित स्वच्छ्ता यामुळे हे शक्य झाले असावे. शास्त्रीय पुरव्यांआधारे असे म्हणता येऊ शकते की, बरे झालेले रुग्ण (Record Patient) / लक्षणे नसलेले रुग्ण यांच्यामध्ये काही कालावधी नंतर अॅन्टीबॉडीज पातळी ही घसरते; ही बाब दोन्ही फेऱ्यांमधील सर्वेक्षणादरम्यानचा कल दर्शविते. तसेच या बाबीचा प्रतिकार शक्तीवर काही परिणाम होत असल्याची माहिती अद्याप नाही.