मुंबई : कोरोना विरोधातल्या लढाईतला एक अत्यंत महत्वाच्या आणि निर्णायक टप्प्यावर सध्या प्रशासनाचं काम सुरु आहे. हा टप्पा म्हणजे कोरोनाचा कल ओळखण्यासाठी सुरु केलेल्या सेरो सर्वेक्षणाचा. कोरोनाविरोधातली आपली पुढची वाटचाल कशी असेल हे ठरवण्यासाठी या सेरो सर्वेक्षणाच्या निष्कर्षांवर केंद्र सरकारचं विशेष लक्ष आहे.

राज्यात कोरोनाबाबत आघाडीवर असलेल्या मुंबईत कोरोनाप्रसाराचा वेग हळुहळू मंदावतोय.कोरोना संक्रमणाचा वेग कमी झाल्यानंतर कोरोनाविरोधातलं पुढचं पाऊल म्हणजे कोरोनाचा कल ओळखणं आणि त्याच्या समुह संसर्गाचा आढावा घेणं आहे. या साठीच आयसीएमआरनं राज्यांना सेरो सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत.

सेरो सर्वेक्षण म्हणजे नेमकं काय?

रक्ताचे नमुने घेऊन करायचे सर्वेक्षण अर्थात सेरो सर्वेक्षणाचे निर्देश दिले होते. त्यानुसार मुंबई महापालिकेनं मुंबईत 3 वॉर्ड मध्ये सेरो सर्वेक्षण सुरु केलं आहे. मुंबईत चेंबुर पश्चिमचा अंतर्भाव असलेल्या एम पश्चिम, माटुंगा परिसरातील एफ उत्तर आणि दहिसर पट्टा असलेल्या आर उत्तर या तीन विभागांमध्ये सेरो सर्वेक्षणाचे नियोजन केले आहे.

बीएमसीचे मेडिकल ऑफिसर भूपेंद्र पाटील यांनी एबीपी माझा ला दिलेल्या माहीतीनुसार, 'कोरोनाशी लढण्यासाठी सेरो सर्वेक्षण हे एक महत्वाचं अस्त्र आहे.अर्थात, हे सेरो सर्वेक्षणाचं अस्त्र कोरोनापासून बचावात्मक आणि कोरोनाचं संकट नेमकं कुठवर फैलावलंय हे ओळखण्यासाठी आहे'.

सुरुवातीला मुंबईतील लोक या सेरो सर्वेक्षणाला घाबरले होते असं सर्वेक्षण करण्यास नकार देत होते. मात्र, याच सर्वेक्षणाच्या आधारे ऑगस्ट महिन्यात कोरोनाविरोधातल्या लढाईत काही महत्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतील.स्थानिक लोकप्रतिनीधी, प्रशासन यांच्या जनजागृतीनंतर सुरुवातीला विरोध करणा-या नागरिकांनीही सेरो सर्वेक्षणाला चांगला प्रतिसाद दिला आहे.

कसं केलं जातंय सेरो सर्वेक्षण

  • हे सर्वेक्षण 12 वयोगटावरील व्यक्तींमध्ये करण्यात येते.

  • झोपडपट्टी, दाटीवाटीच्या वस्त्या आणि इतर विभागांमधून 10 हजार नमुने गोळा केले जात आहेत.

  • या नमुन्यांमधून अॅन्टिबॉडीज चे निदान केले जाईल.

  • किती जणांच्या शरिरात कोरोना अॅन्टिबॉडीज तयार झाल्या आहेत हे तपासले जाईल.

  • अॅन्टिबॉडीजच्या निदानावरुन कोविड संसर्ग संक्रमणाचा कल समजून घेता येईल.

  • या सेरो सर्वेक्षणामध्ये आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्सचे स्वतंत्र सर्वेक्षण केले जाईल.


या सेरो सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे सर्वसाधारण लोकसंख्येत झालेला कोविडचा भौगोलिक फैलाव समजू शकेल. यातून सार्स कोविड 2 संक्रमणाचं प्राबल्य समजून घेता येईल.या संक्रमणातून निर्माण होणारे सामाजिक आणि लोकसंख्याशास्त्रीय धोके निश्चित करण्यास मदत होईल आणि याच आधारावर कोरोनाशी लढण्याची पुढची धोरणं निश्चित करता येतील.