मुंबई : शेअर बाजार उघडण्यापूर्वी मंगळवारी सेन्सेक्समध्ये मोठी पडझड झाली होती, मात्र दिवस संपता-संपता सेन्सेक्सही काहीसा सावरला. सकाळी 1200 अंकांनी झालेली घसरण दिवसअखेर 561 अंकांवर, तर निफ्टीची घसरण 168 अंकांवर थांबली. सध्या सेन्सेक्स 34 हजार 195 आणि निफ्टी 10 हजार 498 अंकांवर आहे.
सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार उघडताच मोठी घसरण पाहायला मिळाली होती. सकाळी सेन्सेक्स तब्बल 1200 अंकांनी गडगडला, तर निफ्टीमध्येही 371 अकांपेक्षा अधिक घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये झालेली घसरण ही 2015 नंतरची सर्वात मोठी घसरण आहे. गुंतवणूकदारांचे पाच लाख कोटी रुपये बुडाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शेअर बाजार का गडगडला?
अमेरिकन बाजारपेठेत झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. अमेरिकेची अवस्था नाजूक असताना फेडरल बँकेनं व्याजदर शून्य टक्क्यांवर आणले होते. मात्र आता अर्थव्यवस्था रुळावर येऊ लागल्यामुळे व्याजदर 1 टक्का करण्यात आले, पण ते आणखी दोन टक्क्यांनी वाढून 3 टक्क्यांपर्यंत व्याजदर जाऊ शकतात, असं फेडरल बँकेनं सूचित केलं आहे. त्यामुळे आज अमेरिकन बाजारानं आपटी खाल्ली. परिणामी विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसा काढून घेतला.
अर्थसंकल्पात दीर्घ गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्यावर भरभक्कम व्याज लावण्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. त्याचाही परिणाम बाजारात दिसून येत आहे. एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत सलग शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. मागील चार दिवसात बाजारात तब्बल 2500 अकांची घसरण झाली आहे.
बजेटच्या बरोबर एक दिवस आधी सेन्सेक्सने तब्बल 36283 अकांपर्यंतची विक्रमी उसळी घेतली होती. पण बजेट सादर झाल्यानंतर शेअर बाजारात प्रचंड घसरण सुरु झाली.