आरपीएफ जवानाने लोकलमधून पडणाऱ्या चिमुरड्याला वाचवलं
एबीपी माझा वेब टीम | 06 Feb 2018 12:25 PM (IST)
RPF जवान सुनील नापा यांनी तातडीने चिमुरड्याच्या दिशेने धाव घेऊन त्याला धरलं, अन्यथा मोठा अनर्थ ओढवला असता.
मुंबई : आरपीएफच्या जवानाने स्वतःचा जीव धोक्यात घालून धावत्या लोकलखाली येणाऱ्या चिमुरड्याचे प्राण वाचवले. मुंबईत पश्चिम रेल्वेवरील नायगाव स्टेशनवर ही घटना घडली. शुक्रवारी झालेला हा प्रकार स्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. धावत्या लोकलमधून उतरणारा चिमुरडा ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील पोकळीत पडणार होता. त्यामुळे आरपीएफ जवान सुनील नापा यांनी धावत जाऊन त्याला पकडलं, असं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. सात वर्षांचा मुलगा आईसोबत स्टेशनवर आला होता. ट्रेन थांबली असताना दोघांनी ट्रेनमध्ये चढण्याचा निर्णय घेतला. महिला आधी चढली, मात्र मुलगा आत शिरेपर्यंत ट्रेन सुरु झाली. त्यामुळे चिमुरड्याचा पाय घसरला. सुनील नापा यांनी तातडीने त्याच्या दिशेने धाव घेऊन त्याला धरलं, अन्यथा मोठा अनर्थ ओढवला असता. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.