मुंबई:  आयएएस अधिकारी मनिषा आणि मिलिंद म्हैसकर यांच्या मुलाने आत्महत्या केल्याचं वृत्त हाती आलं असलं, तरी त्याबाबत संशय आहे. कारण मन्मथ म्हैसकरच्या (वय 18) मृत्यूप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.


तर दुसरीकडे पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. त्यामुळे मन्मथ म्हैसकरची आत्महत्या, हत्या की अपघात असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण?

मिलिंद आणि मनिषा म्हैसकर दोघेही आयएस अधिकारी आहेत. त्यांना मन्मथ (वय 18) हा एकुलता एक मुलगा होता.

मन्मथ हा पुण्यात शिक्षण घेत होता. आज सकाळी मित्राला भेटायला जातोय, असं सांगून घराबाहेर गेला. मात्र त्याने मलबार हिल परिसरातील नेपियन सी रोडवरील दरिया महल इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं.

मात्र मन्मथच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात असल्याने, पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन मुलांना ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांना काय माहिती मिळाली?

आज सकाळी साडेसातच्या सुमारास दरिया महल नेपीयन सी रोड,मलबार हिल,मुंबई या बिल्डिंग वरुन एक इसम पडल्याची माहिती मलबार हिल पोलिसांना मिळाली.

पोलीस ठाण्याचे PSI चौधरी आणि API उंडे घटनास्थळी गेले. त्यावेळी एक व्यक्ती इमारतीवरुन पडल्याचं आढळलं.

अधिक चौकशी केली असता, मृत व्यक्तीचं नाव मन्मथ म्हैसकर असल्याचं समजलं.

मन्मथ आज सकाळी सातच्या सुमारास, मित्र अग्रवाल याला भेटण्यासाठी जात असल्याचं सांगून घराबाहेर पडला होता.

सदर घटना ही मलबार हिल पोलीस ठाणे येथे ADR No.22/17 अन्वये नोंद केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.