मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले यांच्याकडून देण्यात आलेले 40 लाख रुपये स्वीकारण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला आहे.
विक्रोळी पार्कसाईटमधील एसआरए पुनर्विकासातला घोटाळा लपवण्यासाठी एका बिल्डरने तब्बल 11 कोटी लाच देण्याची तयारी दाखवल्याचा दावा संदीप येवले यांनी केला होता. त्यापैकी एक कोटीची रोख रक्कम येवलेंना देण्यात आली. त्यामधील 40 लाख रुपयांची रक्कम संदीप येवले यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याची तयारी दाखवली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी ही रक्कम स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.
आमदार बच्चू कडू यांनी संदीप येवले यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. मुंबईतल्या एसआरए घोटाळ्याची गंभीर दखल घेतली असून लवकरच याप्रकरणी बैठक घेणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांना दिलं.
संदीप येवलेंनी पुरावे द्यावेत नाहीतर 100 कोटींचा दावा ठोकेन: राम कदम
काय आहे प्रकरण?
विक्रोळी पार्कसाईटमधील एसआरए पुनर्विकासातला घोटाळा लपवण्यासाठी एका बिल्डरनं तब्बल 11 कोटी लाच देण्याची तयारी दाखवल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले यांनी केला आहे. या 11 कोटींपैकी 40 लाख देतानाचं स्टिंग ऑपरेशन येवलेनं सादर केलं आहे. विक्रोळीतल्या पार्कसाईट भागातल्या हनुमाननगर योजनेत सुरु असलेला भ्रष्टाचार आणि त्यात बिल्डरनं सगळ्यांना कसं मॅनेज केलं याचे पुरावेही येवले यांनी समोर ठेवले आहे.
दरम्यान, या सगळ्या घोटाळ्यात एसआरएचे अलीकडेच निवृत्त झालेले कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांच्यावरही येवलेंनी गंभीर आरोप केले आहेत. बिल्डरने दिलेले सगळे पैसे घेऊन येवले मुंबई मराठी पत्रकार संघात दाखल झाले आणि संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
या प्रकरणात दाद मागताना खोटे गुन्हे दाखल झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच लाच मिळालेले पैसेही आपण मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
संदीप येवलेंनी नेमके काय आरोप केले?
‘विक्रोळीतील हनुमाननगरच्या विभागात 22 वर्षापासून एसआरए योजना बंद पडली आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या योजनेत आतापर्यंत कायद्याचं उल्लंघन झालं आहे. या योजनेतील भष्ट्राचार आम्ही माहिती अधिकारच्या अंतर्गत उघड केल्यानंतर बिल्डरनं मला 11 कोटीची लाच देण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी 1 कोटीची रोख रक्कम दिली. त्यापैकी 40 लाख मी मीडियासमोर आणले आहेत.’ असा गंभीर आरोप संदीप येवलेंनी केला आहे.
‘या प्रकरणी माझ्याशी बोलणी करण्याकरिता बिल्डरच्या वतीने कौशिक मोरे ही व्यक्ती आली होती. ‘माझं सेटिंगचंच काम आहे. बाबूलाल वर्मा हे तर सीएम आणि पीएमलाही खिशात ठेवतात,’ असं कौशिक मोरेने मला सांगितलं होतं.’ असंही येवले यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
‘बिल्डर मोठा आहे पैसे घेऊन जा. असं मला एसआरएच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.’ असा आरोप त्यांनी एसआरए अधिकाऱ्यांवरही केला.
‘दरम्यान, माझ्यासोबत ज्या मीटिंग झाल्या त्याचे कॉल रेकॉर्डिंगही माझ्याकडे आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.’ अशी मागणी येवलेनं केली आहे.
बिल्डरकडून कोट्यवधीची लाच, रोख रकमेसह सामाजिक कार्यकता मीडियासमोर
माझ्यावर राजकीय दबावही : संदीप येवले
‘माननीय आमदार राम कदम यांना मी दीड वर्षापूर्वी याबाबत निवेदन दिलं होतं. तेव्हा राम कदम मला म्हणाले की, ‘हे लोकं काही तुझ्याकडे बघणार नाही, मी तुला बिझनेस काढून देतो.’ त्यानंतर मी किरीट सोमय्या आणि प्रकाश मेहतांकडे गेलो. पण बिल्डर लॉबीसमोर यांचं काहीच चालत नाही. किरीट सोमय्यांनी तर आम्हाला अक्षरश: हाकलून लावलं.
यावेळी येवलेंनी आमदार राम कदमांना आव्हानही दिलं. ‘राम कदम यांना आम्ही चॅलेंज देतो, की पुढच्या वेळी आम्ही तुम्हाला मंदिरात बसवू आणि आम्ही दुसरा आमदार निवडून आणू.’
येवलेंच्या आरोपांवर राम कदम यांचं उत्तर
संदीप येवले यांच्या आरोपानंतर भाजप आमदार राम कदम यांनीही या आरोपाला उत्तर दिलं आहे. ‘संदीप येवले या व्यक्तीने राजकीय हेतून प्रेरित होऊन माझ्यावर आरोप केले आहेत. जर त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते द्यावेत. त्या भागातील 33 लोकांची घरं मी वाचवली, त्यामुळे या माणसाच्या मागे असणारी लोकं माझ्या मागे आली याचाच त्याच्या मनात राग आहे. महत्त्वाचा मुद्दा असा की, जसा लाच देणारा गुन्हेगार आहे. तसाच लाच घेणाराही गुन्हेगार आहे. त्यामुळे जर 24 तासाच्या आता त्यांनी पुरावे दिले नाहीतर नाईलाजाने मला 100 कोटीचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकावा लागेल. घाटकोपरच्या घरा-घरातील लोकांना माहिती आहे की, राम कदम काय आहे,’असं यावेळी राम कदम म्हणाले.
संदीप येवलेंकडून सहाय्यक निधी स्वीकारण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jul 2017 08:27 AM (IST)
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले यांच्याकडून देण्यात आलेले 40 लाख रुपये स्वीकारण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -