मुंबई: देशभर मोदींच्या स्वच्छता अभियानाचा गाजावाजा सुरु आहे. जाहिरातींचा भडीमार होत आहे. यात मुंबईला हागणदरीमुक्तीचं सर्टिफिकेट मिळालं. सर्टिफिकेटच्या पेपरावरची शाई वाळण्याआधीच मुंबईतल्या रामगडचं जळजळीत वास्तव समोर आलं आहे.


टीव्हीवर दररोज 'दरवाजा बंद कर' ही अमिताभची जाहिरात लागली, की रामगडच्या लोकांचा संताप होतो. त्याचं कारणही तसंच आहे. हे रामगड काही मराठवाडा विदर्भातलं नाही. हे आहे मायानगरी, राजधानी मुंबईच्या पोटातल्या मुलुंडमधलं.

डबे घेऊन महिला, पुरुष, म्हातारे कोतारे, पोरंसोरं बोळाबोळातून शौचालयाला जातात. शेवटी सगळे एका रांगेत उभे राहातात. रामगडच्या गल्याबोळात दिवसभर अशीच डब्यांची वर्दळ असते.

असं म्हणतात मुंबईकरांचं अर्ध आयुष्य रांगेत जातं. रामगडच्या लोकांची सकाळ अशीच रांगेनं सुरु होते. याच रांगेतून कधीही न सुटणाऱ्या प्रश्नांची नवी रांग सुरु होते.

शौचालयाअभावी निर्माण झालेले वेगवेगळे प्रश्न. तासंतास रांगेत उभं राहावं लागतं, ऑफिसला उशीर होतो. बॉस ओरडतो. म्हातारी आजारी माणसं रांगेत तासंतास उभं राहू शकत नाहीत. भांडणं होतात. सकाळ दुपार संध्याकाळ गर्दी गर्दीच असते, असे एक ना अनेक प्रतिक्रिया इथे उमटतात.

हे सगळे प्रश्न शौचालयामुळे का निर्माण केले सांगण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी आहे.

- रामगडमध्ये साधारण 12 चाळीत 18 हजार लोक राहातात

- शौचालयांची संख्या हे फक्त 59 आहे, त्यातलेही 3 बंद आहेत.

- 357 माणसांमागे केवळ एक शौचालय आहे

- पालिकेचं सूत्र आहे 50 माणसांमागे 1 शौचालय

श्रीमंतांच्या टॉयलेटपेक्षाही लहान घरं. जिथून रस्ता जातो, तिथं उंबरा आहे. घरं सुरु होतं आणि सुरु झाल्याझाल्या संपतं. टॉयलेटपेक्षाही लहान घरात टॉयलेट कसं बांधायचं. म्हणून इथल्या लोकांना महापालिकेच्या शौचालयावरच अवलंबून राहावं लागतं.

पण महापालिका म्हणते आमच्याकडेही जागा नाही म्हणून शौचालयं नाहीत. मग चिमुरड्या पोरांनी जीवघेणं कमोड शोधलं. लहान मुलं गटारीवर उभारलेल्या संरक्षक लोखंडी पाईपवर चढून, जीव धोक्यात घालून, अनोख्या कसरतीने शौच करतात.  इथलं वास्तव मांडण्यासाठी ही दृष्य पुरेशी आहेत.

गर्दी आणि घाण असल्याने नाल्यावर जावं लागतं, असं ही मुलं सांगतात.

रामगडचं वास्तव इतकं जळजळीत आहे की शौचालय नाही म्हणून इथल्या पोरांची लग्नही होत नाहीत.

शौचालय नाही म्हणून मला मुलीने नकार दिला, असं इथल्या मुलाने सांगितलं, तर स्थळं येतात पण लग्न होत नाहीत. रामगडच्या सगळ्या पोरांचा हा प्रश्न आहे, असं मुला-मुलींच्या आई सांगतात.

पण भाजप नगरसेविका सविता कांबळे यांना हे पटत नाही

"हा विषय मांडणाऱ्यांनी मांडलाय. इतकी वर्षं राहिलीयत की, टॉयलेटच्या प्रश्नामुळे लग्न होत नाहीत असं नाही. त्यांचं बालपणही इथेच गेलंय", असं सविता कांबळे म्हणतात.

विरोधक विचारताहेत जनतेनं तुम्हाला शतप्रतिशत दिलं. तुम्ही किती प्रतिशत दिलं हिशेब  द्या.

इथले 6 नगरसेवक, आमदार, खासदार भाजपचे. किरीट सोमय्या या भागाचं नेतृत्त्व करतात, त्यांचा मुलगा नील हा नगरसेवक आहे, तर  राज्यात केंद्रात सत्ता भाजपची. मग सगळे मिळून मोदींचं स्वप्नं पूर्ण करू शकत नसतील तर हे दुर्दैव आहे.

राजकीय आरोप प्रत्यारोपात हतबल जनतेचं आयुष्य मात्र डब्यात जातंय.

"आमचे नेते सध्या सुट्टीवर गेलेत. पाच वर्षाच्या रजेवर गेलेत. ज्यावेळी निवडणूक येते, त्यावेळी ते येतात महिनाभर", असा तीव्र संताप इथल्या स्त्रिया व्यक्त करत आहेत.

VIDEO: