मुंबई: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र दररोज उच्चांकी कामगिरी नोंदवत आहे. आज देखील त्यात अजून एका विक्रमाची भर पडली आहे. आज सायंकाळी सातपर्यंत दिवसभरात 7 लाख 26 हजार 588 नागरिकांना लस देण्यात आली. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वोच्च आकडेवारी आहे. राज्यात आतापर्यंत 3 कोटी 9 लाख 79 हजार 460 लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. लसीकरणात सातत्य टिकवत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. ही लक्षणीय कामगिरी करणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात लसीकरण मोहिमेला वेग आला असून त्यामुळे लक्षणीय कामगिरीची नोंद होत आहे. दर दिवशी आधीच्या दिवसाच्या विक्रमी कामगिरीपेक्षा सरस कामाची नोंद होत आहे. काल राज्याने 3 कोटी लस मात्रांचा टप्पा ओलांडला तर आज दिवसभरात 7 लाखांहून अधिक लस देण्याची विक्रमी नोंद महाराष्ट्राच्या नावाने नोंदविण्यात आली असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
Maharashtra Corona Cases : राज्यात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढतेय; कोल्हापूर हॉटस्पॉटच्या मार्गावर
या कामगिरीबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे की, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र दररोज उच्चांकी कामगिरी नोंदवत आहे.आज 7 लाख 26 हजार 588 नागरिकांना लस देण्यात आली.एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वोच्च आकडेवारी आहे. लसीकरणात सातत्य टिकवत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे.ही लक्षणीय कामगिरी करणाऱ्या आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन, असं टोपे यांनी म्हटलं आहे.
राज्यात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढतेय; कोल्हापूर हॉटस्पॉटच्या मार्गावर
राज्यात निर्बंध शिथिल केल्यानंतर काही दिवसांनंतर पुन्हा एकदा काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. राज्यात आज 9,812 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8,752 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 1551 रुग्ण आढळले. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा हॉटस्पॉटच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. तिसऱ्या लाटेचा धोका पाहता सोमवारपासून राज्यात नवीन निर्बंधांची घोषणा करण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेत पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग पसरला होता. या तिन्ही जिल्ह्यात रोज हजारच्या घरात नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद होत होती. शासनाने कडक निर्बंध लावल्यानंतर तीन्ही जिल्ह्याची दैनदिन रुग्णसंख्या हजारच्या आत आली होती. मात्र, आता पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. शनिवारी (26 जून) जिल्ह्यात 1551 नवीन बाधित आढळले आहेत तर 21 मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंता वाढल्या असून कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे.