मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत आजपासून कलम 144 (Mumbai 144) लागू करण्यात आला आहे. आता मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ही जमावबंदी 7 जानेवारी 2022 पर्यंत लागू राहणार आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 
 
30 डिसेंबर 2021 च्या मध्यरात्री बारा वाजल्यापासून 7 जानेवारीच्या रात्री बारा वाजेपर्यंत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व जागी हे आदेश लागू असतील, असं आदेशात म्हटलं आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असेल. याशिवाय महामारी कायदा 1897 आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि इतर कायदेशीर तरतुदींखालील कारवाई केली जाईल, असंही यात म्हटलं आहे.


मुंबई पोलिसांनी आधी 31 डिसेंबर पर्यंत मुंबईमध्ये जमावबंदी लावली होती त्यानंतर त्याचा कालावधी वाढवून सात जानेवारीपर्यंत मुंबईमध्ये जमा बंदी लावण्यात आली आहे ज्यामुळे आता पाच पेक्षा अधिक लोक जमू शकणार नाहीत. तसेच मुंबईमध्ये होणारी सार्वजनिक कार्यक्रम सभा यासाठी सुद्धा शासनाकडून नियम आणि अटी शर्ती घालण्यात आले आहेत.


महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी गर्दी होऊ नये म्हणून आम्ही 144 कलम लागू केलं आहे. लोकांनी गर्दी करु नयेत यासाठी पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत. कोरोना केसेस वाढत चालल्या असल्याने आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्या परिवारासोबत आपण नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करावं.  यावेळी आम्ही कुठल्याही मोठ्या पार्ट्यांना परवानगी दिलेली नाही. जो कुणी अशी पार्टी करताना आढळून येईल त्या आयोजकांवर कारवाई केली जाईल, असं वळसे पाटील यांनी सांगितलं आहे.  


मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा काल दुपटीनं वाढला आहे.. मुंबईत काल दिवसभरात दोन हजार 510 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. 






संबंधित बातम्या : 










LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha