Coronavirus spike in Maharashtra : सरत्या वर्षाला निरोप देण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे कोरोनाने नागरिकांची चिंता वाढवली आहे. मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची वाढ होऊ लागली आहे. ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे. राज्यात बुधवारी  3 हजार 900 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढला आहे. तर, राज्यातील ओमायक्रॉनबाधितांचा आकडा 252 वर पोहचला आहे. 


मुंबईतही कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने चिंता वाढली आहे. मुंबईमध्ये 2510 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात  आली. तर, 251 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या 8060 सक्रिय कोरोनाबाधित आहेत. 


मुंबईमध्ये 20 डिसेंबर रोजी 283 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. मंगळवारी 1377 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. त्यानंतर बुधवारी 80 टक्क्यांनी वाढ झाली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर असताना मे महिन्यात मुंबईमध्ये 8 मे रोजी 2678 बाधितांची नोंद करण्यात आली होती. 


राज्यात बुधवारी 20 बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. सध्या 14 हजार 065 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 65 लाख 6 हजार 137 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.61 टक्के आहे.   सध्या राज्यात 1 लाख 22 हजार 906 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 905 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


ओमायक्रॉनबाधितांची संख्या वाढली


राज्यात  गुरुवारी 85  ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे.  त्यापैकी 53 ओमायक्रॉनबाधित हे मुंबईतील आहे. मुंबईतील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 137 इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत 252 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 99 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 


राज्यातील 252 रुग्णांमध्ये 26 रुग्ण इतर राज्यातील आहेत, जे विदेशातून महाराष्ट्रात आले होते. 9 रुग्ण हे विदेशी  नागरिक आहेत. राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ८७९ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी १७६ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.