ठाणे : ठाण्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक गायब असून त्यांचा शोध घ्या, असं साकडं घालत भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि अधिकृत तक्रार नोंदवली. 


"तीन विविध घोटाळ्याप्रकरणी ईडी चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याने गेले दोन महिने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक गायब आहेत. काय झालं, कोणी किडनॅप केलं, याची भीती मतदारांना वाटत आहे. तेव्हा, त्यांना शोधण्यासाठी कार्यवाही करावी," असं म्हणत काल (26 मे) भाजपा नेते किरीट सोमय्या, ठाणे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, आमदर संजय केळकर आणि भाजप गटनेते मनोहर डुंबरे आदीच्या शिष्टमंडळाने नवनियुक्त पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांची भेट घेतली.


ठाण्यातील ओवळा-माजिवड्याचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीवर ईडीने छापा टाकल्यानंतर त्यांच्यावर चौकशीची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून आमदार प्रताप सरनाईक गायब असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 


नुकतेच ओवळा-माजिवडा मतदारसंघातील मतदारांनी "कोरोना न होताही आमदार क्वॉरन्टीन," अशा आशयाचे फलक जागोजागी लावल्याने आमदार सरनाईक चर्चेत आले. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने बुधवारी (26 मे) पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तसंच, सरनाईक हरवले आहेत, त्यांचं काय झालं, कोणी किडनॅप केलं? याची भीती मतदारांना वाटत आहे. त्यामुळे आमदार सरनाईक यांचा शोध घेण्यासाठी कार्यवाही करावी, अशी अधिकृत तक्रार पोलीस आयुक्तांकडे केल्याची माहिती सोमय्या यांनी दिली. 


बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी सरनाईक यांच्या संपत्तीवर ईडीचे छापे
ईडीने नोव्हेंबर 2020 मध्ये बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांचीही ईडीने चौकशी केली. ईडीने टॉप्स ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार अमित चांदोळे यांची चौकशी केल्यानंतर त्यांना अटकही केली होती. छापा आणि चौकशीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले, मग या चर्चा थंडावल्या असतानाच 18 मे रोजी ईडीने सरनाईक यांच्या लोणावळ्यातील बंगल्यावर छापा टाकल्याचं समोर आलं होतं.