मुंबई : मुंबईतल्या प्रसिद्ध ग्रँड हयात हॉटेलमध्ये कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत, कॅनेडियन रॅपर एबी ढिल्लोनच्या गाण्यावर तरुणाई थिरकली होती आणि कोरोनाला गर्दीमध्ये चिरडणाऱ्यांमध्ये बॉलिवूडची स्टार मंडळी आघाडीवर होती. वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ग्रँड हयात हॉटेलमधल्या कॉन्सर्टमध्ये अभिनेत्री सारा अली खान, तिचा भाऊ इब्राहिम अली खान, जान्हवी कपूर, सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर ही मंडळी हजर होती. त्यांना कॅमेऱ्यानं कैद केलं आहे.
या कार्यक्रमात अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता. सोशल डिस्टन्सिंगची देखील ऐशीतैशी करण्यात आली. खरं तर सेलिब्रिटींना तरुणाई फॉलो करते. सेलिब्रिटींनी कोणत्या कार्यक्रमाला हजेरी लावावी हा त्यांचा खासगी प्रश्न आहे. मात्र कोरोनाच्या संकटात सोशल डिस्टन्सिंगचं पालन न केल्यानं ही स्टार मंडळी टीकेचे धनी ठरताहेत. दरम्यान कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याप्रकरणी या कार्यक्रमाच्या आयोजकांवर कारवाई करण्यात आली आहे. लाइव्ह कॉन्सर्ट आयोजित केलेल्या आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ग्रँड हयातमध्ये कोरोना नियमांचा ग्रँड फज्जा; ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग
राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. कोरोना रुग्णांची संख्याही कमीजास्त होत आहे. अशात राज्य सरकारकडून मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. पण असे असतानाही मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये कोरोना नियमांचा फज्जा उडाल्याचं चित्र समोर आलं होतं. ग्रँड हयातमध्ये कॅनेडियन रॅपरच्या कार्यक्रमाला शेकडो लोकांनी उपस्थिती लावली होती. सोशल डिस्टन्सिंग तर सोडा यावेळी एकाच्याही चेहऱ्यावर मास्क दिसत नव्हता. ग्रँड हयातमधील दृश्य पाहून कोरोनाला आमंत्रण देतोय का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
मुंबईमध्ये सध्या जमावबंधी म्हणजेच 144 कलम लागू आहे. असं असतानाही मुंबईतील कालीना येथील ग्रँड हयातमध्ये कार्यक्रमाला परवानगी कशी मिळाली हा प्रश्न उपस्थित राहतोय. या कार्यक्रमात कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर ठेवल्याचं दिसून येत आहे. शारीरिक अंतर नाही, मास्क नाही. कॅनेडियन रॅपर धील्लोनच्या लाईव्ह कॉन्सर्टचा कार्यक्रम रविवारी येथे आयोजित करण्यात आला होता.