राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. कोरोना रुग्णांची संख्याही कमीजास्त होत आहे. अशात राज्य सरकारकडून मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. पण असे असतानाही मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये कोरोना नियमांचा फज्जा उडाल्याचं चित्र समोर आलं आहे. ग्रँड हयातमध्ये कॅनेडियन रॅपरच्या कार्यक्रमाला शेकडो लोकांनी उपस्थिती लावली होती. सोशल डिस्टन्सिंग तर सोडा यावेळी एकाच्याही चेहऱ्यावर मास्क दिसत नव्हता. ग्रँड हयातमधील दृश्य पाहून कोरोनाला आमंत्रण देतोय का? असा प्रश्न उपस्तित होतोय.
मुंबईमध्ये सध्या जमावबंधी म्हणजेच 144 कलम लागू आहे. असं असतानाही मुंबईतील कालीना येथील ग्रँड हयातमध्ये कार्यक्रमाला परवानगी कशी मिळाली हा प्रश्न उपस्थित राहतोय. या कार्यक्रमात कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर ठेवून दिले आहेत. शारीरिक अंतर नाही, मास्क नाही. कॅनेडियन रॅपर धील्लोनच्या लाईव्ह कॉन्सर्टचा कार्यक्रम रविवारी येथे आयोजीत करण्यात आला होता. ज्यात हजारोंच्या संख्येने तरुणांईने उपस्थिती दर्शवली होती. या कार्यक्रमात कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर ठेवून लोक नाचताना दिसतायेत.
कलम 144 लागू असल्यामुळे दोन दिवसांपूर्वी एमआयएमच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती. पण आता या म्युझिक कार्यक्रमाला परवानगी नेमकी दिली कुणी? असा प्रश्न उपस्थित केला जातेय.
दरम्यान, रविवारी मुंबईत 187 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालीये. तर आज 219 रुग्णांची कोरोनावर मात केलीये. मुंबईत सध्या एक हजार 774 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर मुंबईतील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97 टक्क्यांवर गेलंय. मुंबईत आतापर्यंत ओमायक्रॉनचे पाच रुग्ण आढळले आहेत.
राज्यात आज 704 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
महाराष्ट्रात रविवारी 704 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 699 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आज 16 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12% एवढा आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची 66,43,883 इतकी झाली आहे. राज्यातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 64,92, 504 इतकी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.72% इतके झाले आहे. राज्यात सध्या 75,313 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 855 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 6,441 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live