Raj Thackeray Nashik Daura : आगामी महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं चांगलीच कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. मनसेच्या पुनरुज्जीवनाचा मेगा प्लॅन आखला असून राज ठाकरे (Raj Thackeray) महाराष्ट्र दौऱ्यापासून पुनश्च हरिओम करणार आहेत. राज्यभरात जाऊन कार्यकर्ते, नेत्यांचं जाळं विस्तारण्यासाठी राज ठाकरे पुन्हा एकदा मोठी पावलं उचलणार आहेत. तसेच, पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक या शहरी भागापलीकडेही मनसे आपला विस्तार करण्यासाठी मोठी रणनीती आखली जात आहे.


राज ठाकरे राज्यातील विविध जिल्ह्यांचे दौरे करणार असून यादरम्यान ते कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. सध्या मुंबई (Mumbai), पुणे (Pune) आणि नाशिककडे (Nashik) मनसेनं जास्त लक्ष केंद्रीत केलं आहे. तर राज ठाकरे औरंगाबादचा दौराही करणार आहेत. एवढंच नाहीतर राज ठाकरे मराठवाडा दौराही करणार आहेत. 


राज्यभरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये दौरे आयोजित केले आहेत. या दौऱ्यांमध्ये ते सर्वप्रथम मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. ही माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबईत झालेल्या एका बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली होती. 


पाहा व्हिडीओ : सत्तेचा राजमार्ग 



काही दिवसांपूर्वी आगामी महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांनी मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 10 दिवसांचा महाराष्ट्र दौरा करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या आखणीसाठीच आजची बैठक बोलवण्यात आली होती, असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बोलताना सांगितलं होतं. 


दरम्यान, सध्या महाराष्ट्रात मनसेचा एकच आमदार आहे. नगरसेवक आणि झेडपी सदस्य संख्याही हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. तर, मुंबई पालिकेत केवळ 1 नगरसेवक राज ठाकरेंसोबत आहे. पुण्यातही पहिल्या निवडणुकीत 27 नगरसेवक असलेला आकडा आता दोन अंकीही राहिलेला नाही. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे सज्ज झाली असून मनसे काय रणनीती आखणार आणि मनसेला पुनरुज्जीवन मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


राज ठाकरेंचा नाशिक दौरा


महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात करताना राज ठाकरे सर्वात आधी नाशिकचा दौरा करणार आहेत. त्यासाठी ते नाशिकला रवाना झाले आहेत. आज सकाळी 10 वाजता नाशिक मध्यवर्ती कार्यालयात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत काही कार्यकर्त्यांचा मनसेत जाहीर प्रवेश होणार आहे. त्यानंतर ते स्थानिक कार्यकर्त्यांशीही संवाद साधतील. नाशिकच्या दौऱ्यानंतर राज ठाकरे औरंगाबादकडे रवाना होणार आहेत. औरंगाबादेतही ते स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. 


देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी पाहा एबीपी माझा युट्यूब लाईव्ह