मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटदाराला मारहाण केल्याच्या आरोपानंतर, नगरसेवक तुर्डे यांना अटक करण्यात आली आहे.


कुर्ला इथं शौचालय बांधकामात होत असलेल्या दिरंगाईमुळे, नगरसेवक तुर्डे यांनी थेट कॉन्ट्रॅक्टक आणि इंजिनियरला मारहाण केल्याचा आरोप आहे.

काल रात्रीच्या या घटनेनंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. यावरुन कुर्ला पोलिसांनी तुर्डेंना अटक केली आहे.

एकमेव नगरसेवक

मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी सहा नगरसेवकांनी सोडचिठ्ठी दिल्याने संजय तुर्डे हे एकमेव नगरसेवक सध्या मनसेसोबत आहेत. संजय तुर्डे यांच्यावर मुंबई महापालिका निवडणुकीनंतर विरोधी उमेदवाराकडून हल्ला झाला होता. पक्षासाठी हल्ला सहन करणारे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे मनसेसोबत आहेत.

कोण आहेत संजय तुर्डे?

संजय तुर्डे हे कुर्ल्यातील वॉर्ड क्रमांक 166 चे नगरसेवक आहेत. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर संजय तुर्डे आपल्या कार्यकर्त्यांसह घराबाहेर जल्लोष साजरा करत होते. परंतु याचवेळी संजय तुर्डे आणि 20 ते 25 कार्यकर्त्यांवर हल्ला झाला. ज्यात तुर्डे यांच्यासह पाच कार्यकर्ते गंभीर जखमी झाले होते. भाजपचे पराभूत उमेदवार सुधीर खातू यांनी हल्ला केल्याचा आरोप संजय तुर्डे यांनी केला होता.

संबंधित बातम्या 

मनसेची साथ न सोडणारा एकमेव नगरसेवक कोण?  

राज ठाकरेंसोबत प्रामाणिक : मनसे नगरसेवक संजय तुर्डे  

संजय तुर्डेंना गटनेतेपद द्या, राज ठाकरेंचं मुंबई पालिकेला पत्र