Sanjay Raut on PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुण्यातील सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा उल्लेख अतृप्त आत्मा असा केला होता. पंतप्रधान मोदींच्या टीकेनंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) चांगलीच आक्रमक झाली आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान मोदींना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊत म्हणाले की, मोदींचा एक अतृप्त आत्मा आहे. हा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय. जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. जे मराठी माणसाचे शत्रू आहेत, असे अनेक आत्मे महाराष्ट्रात साडेचारशे वर्षांपासून भटकत आहेत. ज्यांना महाराष्ट्राने गाडले असे सगळे आत्मे भटकत आहेत.
भाजपचा अंतिम संस्कार महाराष्ट्रातच होईल
हा नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय आहे. पण भाजपाचा अंतिम संस्कार महाराष्ट्रातच होईल. या भुताटकीच्या वक्तव्यांना महाराष्ट्र जुमानत नाही. महाराष्ट्राने अंधश्रद्धा फेकाफेकी यांना कधीही महत्त्व दिलं नाही. महाराष्ट्र पवित्र आत्म्यांचा प्रदेश आहे. काल मोदी पुण्यात होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख तरी त्यांनी केला का? आंबेडकरांवरती भाजपला राग आहे. संविधान त्यांना बदलायचे आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले आंबेडकरांचे संविधान त्यांना बदलायचे आहे.
ज्यांनी महाराष्ट्रासाठी बलिदान दिलं ते मोदींना शाप देतील
उद्या एक मे आहे 105 आत्मे ज्यांनी महाराष्ट्रासाठी बलिदान दिलं ते उद्या मोदींना शाप देतील. जेवढं मराठी आणि महाराष्ट्राचे नुकसान मोदींनी केलं तेवढं कोणीही केलं नाही. या अतृप्त आत्म्यांविरोधात महाराष्ट्राची लढाई आहे. मोदी माझ्याविषयी बोलले मला माहिती आहे. जर तुमच्यासारखा एकच पंतप्रधान बसला तर या राज्याची भुताटकी होऊन जाईल. आमच्याकडे पंतप्रधान पदाचे एकापेक्षा जास्त चेहरे आहेत. हे लोकशाहीचे उत्तम उदाहरण आहे. आम्ही पंतप्रधान लादणार नाही लोक जे स्वीकारतील तो प्रधानमंत्री होईल, असे टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे.
काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?
पुण्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपल्याकडे म्हटलं जातं काही अतृप्त आत्मा असतात. त्यांची स्वप्नं पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे ते दुसऱ्यांच्या स्वप्नांमध्येही माती कालवतात. ४५ वर्षांपूर्वी येथील एका बड्या नेत्याने आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी या खेळाची सुरुवात केली होती. तेव्हापासून महाराष्ट्रात अस्थिरता आली. अनेक मुख्यमंत्री त्यांचा कार्यकाळही पूर्ण करु शकले नाहीत. हा अतृप्त आत्मा 1995 मध्ये शिवसेना-भाजपाचं सरकार अस्थिर करु पाहत होता. 2019 साली अतृप्त आत्म्याने काय केलंय हे राज्याने पहिले आहे. आता देश अस्थिर करण्याचा प्रयत्न या आत्म्याने सुरु आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता केली होती.
आणखी वाचा