Sanjay Raut Rokhthok : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीनं (ED) पत्राचाळ प्रकरणी अटक केली आहे. राऊत यांना अटक केल्यानंतर त्यांना सामनामधील रोखठोक हा कॉलम येणार की नाही याकडे लक्ष लागून होतं. मात्र त्यांचं हे सदर आज प्रकाशित झालं आहे. यात त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान राऊत यांच्या या सदरावरुन मनसेनं मात्र प्रश्न उपस्थित केले आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेले राऊत हे काही स्वातंत्रसेनानी नाहीत की त्यांना जेलमधून लेखनाची परवानगी मिळावी. त्यांच्या नावावर दुसरंच कोणी लिहीत आहेत? असा सवाल मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केला आहे.
संदीप देशपांडे यांनी काय म्हटलंय?
मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे की, आज सामनामध्ये संजय राऊत यांच रोखठोक हे सदर आले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेले राऊत हे काही स्वातंत्रसेनानी नाहीत की त्यांना जेल मधून लेखनाची परवानगी मिळावी की त्यांच्या नावावर दुसरंच कोणी लिहीत आहेत? असा सवाल त्यांनी केला आहे.
रोखठोकमधून राज्यपालांवर ताशेरे
संजय राऊत यांनी लेखात म्हटलं आहे की, कोश्यारी यांनी मुंबईसंदर्भात एक वक्तव्य केले. 'गुजराती-राजस्थानी नसतील तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही' असे ते म्हणाले. राज्यात संतापाचा भडका उडाल्यावर राज्यपालांनी माफी मागितली, पण प्रश्न कायम आहे! मुंबई आणि गुजराती बांधवांचे नाते काय? गुजराती मुंबईत कधी आले? राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेची अखेर माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राबाबत चुकीची विधाने केल्याबद्दल पंडित नेहरू व मोरारजी देसाई यांनाही माफी मागावी लागली होती. नेहरू व मोरारजी देसाई यांनी इतिहासातील चुकीच्या संदर्भाचा आधार घेत विधाने केली. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाचा आगडोंब उसळला. नेहरूंसारख्या लोकप्रिय नेत्यालाही महाराष्ट्राची माफी मागावी लागली. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी कोणी खेळ केलाच तर मराठी माणूस उसळून बाहेर पडतो, हा इतिहास आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
मुंबईचे 'आर्थिक महत्त्व' आहे ते कोणामुळे निर्माण झाले?
राऊतांनी लेखात म्हटलं आहे की, मुंबईच्या विकासाचा पाया कोणी घातला आणि आज जे मुंबईचे 'आर्थिक महत्त्व' आहे ते कोणामुळे निर्माण झाले? गुजराती समाजाचे त्यात किती योगदान आहे? हे नव्या पिढीने समजून घेतले पाहिजे. मुंबईत गुजराती लोक 1669 सालापासून राहण्यास आले. ते कोणत्या परिस्थितीत येथे आले, याचा लेखी पुरावाच उपलब्ध आहे. 'इंग्लिश रेकॉर्ड ऑन शिवाजी' या पुस्तकात 26 नोव्हेंबर 1669 चे एक पत्र प्रसिद्ध झाले आहे. अनेक पारशी आणि मराठी लोकांनी मुंबईचे वैभव वाढविले. जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट या पुरुषाचे मुंबईच्या वैभवात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते स्वतः मोठे धनाढ्य होते. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने संपत्ती मिळवली आणि मुंबईचे वैभव वाढविण्यासाठी खर्च केली. मुंबईचा विकास आणि असंख्य लोकोपयोगी कामे करण्यासाठी नाना शंकरशेट यांनी आपल्या संपत्तीचा प्रवाह वाहता ठेवला. भाऊ दाजी लाड हे मुंबईच्या वैभवात भर टाकणारे आणखी एक नाव. मराठी धनिक लोक हे कधीच व्यापारी वृत्तीने वागले नाहीत. आपल्या मुंबईसाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केले. राज्यपाल कोश्यारी यांनी आता महाराष्ट्राची माफी मागितली आहे. त्यामुळे विषयावर पडदा पडला असला तरी मुंबईच्या विरोधातील कारस्थाने सुरूच राहतील. ती कायमचीच थांबवायला हवीत! असं राऊत यांनी लेखात म्हटलं आहे.