Sanjay Raut Press Confarnce : बाप-बेटे जेलमध्ये जाणारच, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्यांवर (Kirit Somaiya) हल्लाबोल केला आहे. तसेच, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरु असल्याचा पुर्नउच्चारही राऊतांनी यावेळी केला आहे. आर्यन खानचे कोणत्याही ड्रग रॅकेटशी संबंध असल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचंही एनसीबीच्या एसआयटीनं स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात बोलताना संजय राऊतांनी आर्यन खान प्रकरणात एनसीबीनं बनाव केल्याचं उघड झालं असल्याचं म्हटलं आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "जे मोठ्या वार्ता करतात, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करतात, ते सर्व जेलमध्ये जाणारच. महाराष्ट्र सरकार, येथील तपास यंत्रणा आणि पोलीस अनेक गोष्टींचा तपास करण्यासाठी सक्षम आहेत." नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याचंही राऊतांनी सांगितलं. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, "ज्यावेळी मी माझी पहिली पत्रकार परिषद घेतली, त्यावेळीही सांगितलं की, बाप-बेटे जेलमध्ये जाणार. आतापर्यंत तुम्ही इतरांना धमक्या देत होता, याला जेलमध्ये पाठवीन, त्यांना जेलमध्ये पाठवीन. मग तुम्ही अटकपूर्व जामीनासाठी धावपळ का करताय? आतापर्यंत कोणताही गुन्हा दाखल नाही. कोणत्या गुन्ह्यातंर्गत गुन्हा दाखल होणार, याची स्पष्टता नाही. पीएमसी बँक घोटाळ्यात तुम्हाला अटकेची भिती वाटत असेल, तर तसं सांगा, असं सरकारी वकिलानं युक्तीवाद केल्याचं मी आता वाचलं. अशी प्रकरणं मी पाहत नाही फार, हे किरकोळ प्रकरण आहे. मी जे साडेतीन म्हणालो, ते तुम्ही मोजत राहा."
"त्या साडेतीन लोकांची नावं जाहीर केली, तर ते अटकपूर्व जामिनासाठी जातात. जसजशी त्यांना अटक होईल, तसतसं तुम्हाला समजेल. पण माझे शब्द लिहून ठेवा, हे बाप-बेटे आणि इतरही काही लोक, जे मोठमोठ्या गप्पा करतात, ते सगळे तुरुंगात जाणार आहेत", असं राऊत म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, "हे एक प्रकरण नाही. अनेक प्रकरणं आहेत, ज्यामध्ये हे बाप-बेटे जेलमध्ये जाणार आहेत. त्याच्याबरोबर अनेक अधिकारी, केंद्रीय तपास यंत्रणांनी जे घोटाळे करुन ठेवले आहेत. यातली काही प्रकरणं मी पंतप्रधान कार्यालयाकडे सुपूर्द केली आहेत. काही पुराव्यासह माझ्याकडे आहेत. अधिवेशन संपलं की, मी समोर येऊन सांगेल. ज्या अधिकाऱ्यांना वाटतं की, आपलं राज्य आहे. ते भ्रमात आहेत."
आर्यन खान प्रकरणात एनसीबीनं बनाव केल्याचं उघड : संजय राऊत
"आर्यन खान प्रकरणात एसआयटीनं सांगितलं की त्या मुलाकडे ड्रग्ज सापडलंच नाही. असा बनाव आमच्या प्रत्येकाच्या बाबतीत केला जातोय. हे उघड होईल. आता मी समोर आलोय. आत्तापर्यंत मी यात पडलो नव्हतो. आता मी सगळ्यांचे मुखवटे उतरवून त्यांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही. माझे शब्द लिहून ठेवा.", असं संजय राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Nana Patole : ज्यांना मुलं बाळं नाहीत, अशांना त्यांच्या वेदना काय कळणार, नाना पटोलेंचा पंतप्रधान मोदींना टोला
- माढ्याच्या खासदारांवर त्यांच्याच कट्टर कार्यकर्त्याकडून फसवणुकीचे आरोप; नाईक निंबाळकरांचं स्पष्टीकरण
- IPCC Report 2022 : हवामान बदलाचा मोठा फटका मुंबईला बसणार, पाहा काय सांगितलंय IPCC च्या अहवालात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha