Sanjay Raut on Eknath Shinde : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला पुन्हा एकदा ओपन चॅलेंज दिलं आहे. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुकीला सामोरं जा असं आव्हान राऊतांनी शिंदे गटाला दिलं आहे. तसंच जे फुटले त्यांची शिवसेना असू शकत नाही असंही राऊतांनी म्हटलं आहे. तुमच्याकडे 54 आमदार असून द्या, राजीनामे द्यायचे आणि आपापल्या मतदारसंघात जाऊन निवडणुका लढवण्याची हिंमत दाखवा. हे माझं खुलं आव्हान आहे. तुम्ही गुवाहाटीत बसून आम्हाला शिवसेनेची, हिंदुत्वाची अक्कल शिकवणार, अशा शब्दात राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. 


संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावाल, त्यांचे भक्त आहोत असं म्हणाल. पण बाळासाहेबांचे भक्त अशा प्रकारे पाठित खंजीर नाही खुपसणार. जे व्हायचंय ते होऊ द्या. जे करायचंय ते करा. मुंबईत तर यावं लागले ना? तिथे बसून आम्हाला सल्ला-मार्गदर्शन करत आहेत. लाखो शिवसैनिक जमिनीवर आहेत. आमच्या एका इशाऱ्याची वाट पाहात आहेत. पण आम्ही अजूनही संयम ठेवला आहे. त्यामुळे कोण शक्तीप्रदर्शन करत आहेत, कोण काय करतंय त्यानं काही फरक पडत नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे.  
 
संजय राऊत म्हणाले की,  ते लोक कोणत्या नशेत आहेत ते माहिती नाही. त्यांना खाण्यात अफू, चरस, गांजा देतात काय कुणास ठाऊक. अडीच वर्षांपासून सत्तेत आहेत. सगळे मंत्री बनून बसले आहेत. मलईदार खाती घेऊन बसले आहेत. आता अचानक त्यांना साक्षात्कार झालाय का? असा सवाल राऊतांनी केला आहे. 


राऊत यांनी म्हटलं की, जे फुटले त्यांची शिवसेना असू शकत नाही. तुमच्यात धमक आहे तर आमदारकीचे राजीनामे द्या. मी नारायण राणेंना मानतो. त्यांचा गट लहान होता. पण त्यांनी राजीनामे दिले. ते निवडणुकीला सामोरे गेले. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदेंचे 22 लोक फुटले. राजीनामा दिला. निवडणुकीला सामोरे गेले, जिंकून आले. त्यांनी सरकार बनवलं. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही राजीनामे द्यायचे, असं आव्हान राऊत यांनी दिलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Maharashtra Political Crisis Timeline : राजकीय सत्तासंघर्षाचा आज सहावा दिवस, पहिल्या दिवसापासून आतापर्यंत काय काय घडलं?


'फुटिरांबरोबर सरकार बनवणे म्हणजे अस्वलाच्या गुदगुल्या'; संजय राऊतांचा 'रोखठोक' हल्लाबोल