Maharashtra Rain : मागील दोन तीन दिवसात राज्यातील काही ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. मात्र, आज अनेक ठिकाणी पावसानं उघडीप दिली आहे. अद्यापही काही ठिकाणी चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला, त्या ठिकाणचे शेतकरी पेरणी करत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, रात्री मुंबई शहरासह परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तसेच अहमदनगर, गडचिरोलीसह वसई विरार, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस झाला. 


रत्नागिरीत पावसाची जोरदार हजेरी 


दरम्यान, राज्याच्या काही भागात  पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळं पेरणीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, राज्यातील इतर भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पेरणीसाठी शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी. दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारा ठिकाणी ताशी 40 ते 50 कि.मी. ते 60 कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा वर्तवण्यात आला आहे. मच्छिमारांनी सदर कालावधीत मासेमारीसाठी समुद्रात जावू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यात गेले दोन दिवस पावसाची दमदार हजेरी, दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळं बळीराजा सुखावला आहे. तर पुढील दोन दिवस असाच मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. 


पेरण्या रखडल्या


एकीकडं हवामान खात्याकडून भाकितांचा पाऊस पडतोय, तर दुसरीकडं राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाअभावी पेरणी रखडली आहे. मान्सूननं महाराष्ट्र व्यापल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलं असलं तरी प्रत्यक्षात राज्यभरात पावसाची प्रतीक्षा आहे. पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांना पेरणीची तिफण गोठ्यातच ठेवावी लागली आहे. राज्यात खरीप हंगामातील तृण धान्याखालील क्षेत्र 36 लाख 37 हजार हेक्टरपर्यंत आहे. तर तेलबियांचे (भुईमूग, तीळ, कारळ, सुर्यफूल, सोयाबीन) क्षेत्र 41 लाख 58 हजार हेक्टर तर कापसाचं क्षेत्र जवळपास 42 लाख हेक्टरपर्यंत आहे.


अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरासह तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. अनेक दिवसानंतर पावसाचं पुनरागमन झालं आहे. अचानक आलेल्या पावसानं उष्म्या पासून त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला आहे.