Maharashtra Political Crisis : राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची खलबतं सुरू झाली आहेत. आज सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. शरद पवार यांच्या निवासस्थानी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण दाखल झाले आहेत. तर, शिवसेनेकडून अनिल देसाई सहभागी झाले आहेत. आगामी काळात कोणती पावले उचलावीत याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. 


शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष सावध झाले आहेत. मागील काही दिवसात शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्याही बैठका पार पडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शनिवारी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेने बंडखोरांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या विधानसभा उपाध्यक्षांनी शिवसेनेच्या 16 बंडखोरांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे. 


तर, दुसरीकडे शिंदे गटाने विधानसभा उपाध्यक्षांच्या कारवाईला कोर्टात आव्हान देण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे आता राजकारणासोबत कायदेशीर लढाई सुरू होणार असल्याची चिन्हं आहेत. महाविकास आघाडीकडून सर्व बाजूंचा विचार केला जात असून प्रमुख नेत्यांमध्ये खलबतं सुरू आहेत.  


दरम्यान, एकनाथ शिंदे गटाची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. शिंदे गटाकडून कोर्टात याचिका दाखल करण्यासाठी आणि कायदेशीर प्रक्रियेबाबत विचार विनिमय करण्यात येणार आहे.