कोकण पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेने उडी घेतली आहे. ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांना सेनेने उमेदवारी जाहीर केली आहे.
भाजपकडून निरंजन डावखरे निवडणूक लढवणार असून राष्ट्रवादीही आव्हाड समर्थक नजिब मुल्ला यांना रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तिरंगी होण्याची चिन्हं आहेत.
निरंजन डावखरेंविरोधात आव्हाडांचा कट्टर समर्थक मैदानात
नजिब मुल्ला यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून केवळ अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे. त्यामुळे एकाच पक्षात असताना डावखरे आणि आव्हाड यांच्यात रंगलेल्या संघर्षाचा दुसरा अंक पुन्हा सुरु होण्याची चिन्हं आहेत.
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून निरंजन डावखरेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. स्थानिक राजकारणात जितेंद्र आव्हाडांमुळे डावखरे पिता पुत्र नाराज होते. 6 जून 2016 रोजी विधानपरिषद निवडणुकीत वसंत डावखरे पडले. या निवडणुकीत स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी पक्षाने मदत न केल्यामुळे वसंत डावखरे बिथरले होते.
अनेकवेळा पक्षाध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. पवारांनी फोन करुन कान टोचल्यावर गोष्टी तात्पुरत्या शांत होत होत्या. पण नंतर पुन्हा तेच राजकारण सुरु व्हायचं.
पदवीधर निवडणुकांसाठी 25 जूनला मतदान होणार आहे, तर 28 जूनला मतमोजणी होणार आहे.