अंबरनाथ : शिवसेना नगरसेविकेच्या पतीवर हल्ला झाल्याची घटना गुरुवारी अंबरनाथमध्ये घडली. प्रभाग 37 च्या नगरसेविका रेश्मा काळे यांचे पती अजित (छोटू) काळे यांच्यावर हा हल्ला झाला. यात काळे यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


प्रभाग 37 मध्ये रस्ता रुंदीकरण होणार असून त्यात अनेक दुकानं तुटणार आहेत. त्यातूनच हा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

गुरुवारी सायंकाळी छोटू काळे यांचा कार्यकर्ता तेजा यादवला मोतीराम पार्क भागात मारहाण झाल्याची माहिती मिळाल्याने छोटू काळे यांनी तिथे जाऊन विचारपूस केली. याचवेळी तिथे आलेल्या विनोद माने आणि प्रवीण (शिलू) माने यांनी छोटू काळे यांना धक्काबुक्की करत त्यांच्या डोक्यात रॉडने मारहाण केली. यात काळे जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल  केला असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.