मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणातील आरोपीनं आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ए. जी. पेरारीवलन उर्फ अरीवू यानं बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच जेलमधून का सोडण्यात आलं, त्यासाठी कोणते निकष लावले? असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
संजय दत्तप्रमाणेच अरीवू यालाही आर्म्स अॅक्टअंतर्गत ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. संजय दत्तची दया याचिका राष्ट्रपतींनीही फेटाळून लावल्यानंतरही त्याला आपली उर्वरीत शिक्षा जेलमध्ये जाऊन भोगावी लागली. मात्र त्यातही महाराष्ट्र सरकारनं संजय दत्तची मुदतपूर्व सुटका कशाच्या आधारे केली? याची माहिती अरीवू यानं साल 2016 मध्ये माहितीच्या अधिकारांतर्गत मागण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र ती आजवर उपलब्ध न झाल्यानं त्यानं अखेर आपल्या वकिलामार्फत मुंबई उच्च न्यायालयात यासाठी धाव घेतली आहे.
राजीव गांधी यांच्या हत्येसाठी दहशतवाद्यांनी वापरलेल्या मानवी बॉम्बमध्ये दोन नऊ व्होल्टच्या बॅटरी जोडलेल्या होत्या. त्या अरीवू यांनं पुरविल्याचा आरोप ठेवून वयाच्या 19व्या वर्षीच त्याला कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मात्र ही बॅटरी कशासाठी वापरण्यात येणार होती, याची कल्पना नसल्याचं त्याच्यावतीनं कोर्टात सांगण्यात आलं होतं. संजय दत्तनंही आपल्या बचावात हाच पवित्रा घेतला होता. अवैध शस्त्र ही आपण केवळ आपल्या कुटुंबियांच्या रक्षणासाठीसोबत ठेवली होती. ती कुठून आली, कशासाठी आणली याची आपल्याला माहिती नव्हती, असं त्यानं कोर्टाला सांगितलं होतं.
साल 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणी भारतात आणलेली काही शस्त्र संजय दत्तकडे सापडली होती. याप्रकरणी कोर्टानं त्याला 6 वर्षांची शिक्षा सुनावली होती. सुरुवातीच्या काळात शिक्षा भोगून आल्यानंतर आपली उर्वरीत शिक्षा संजय दत्तनं मे 2013 पासून पुण्यातील येरवडा कारागृहात राहून पूर्ण केली. त्यानंतर जेलमधील त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे राज्य सरकारनं तब्बल 256 दिवस आधीच त्याची जेलमधून सुटका केली.