मुंबई: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात (Aryan Khan Cruise Drugs Case) आता आणखी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. एनसीबीचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede Latest News)यांना 50 लाख रुपयांची लाच दिल्याच्या प्रकरणी शाहरुख खानवर (Shah Rukh Khan) गुन्हा दाखल करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. लाच प्रतिबंधक कायद्यानुसार लाच घेणाऱ्यासह लाच देणाराही तितकाच दोषी असल्याचं या याचिकेत म्हटलं आहे. वकील निलेश ओझा यांनी दाखल याचिकेवर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे. 


समीर वानखेडे यांच्या विरोधात सीबीआयनं (CBI) दाखल केलेल्या प्रकरणात शाहरुख खानलाही आरोपी करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. सीबीआयच्या एफआयआरमध्ये शाहरुख खानने आर्यन खान याला वाचवण्यासाठी समीर वानखेडे यांना 50 लाख रुपये लाच दिल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. शाहरुख खाननं जर लाच दिली असेल तर त्यालाही आरोपी करावं, अशी याचिकेत मागणी मागणी करण्यात आली आहे. 


सीबीआयचे वानखेडे यांच्याविरोधात आरोपपत्र


वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयनं  गंभीर आरोप केले आहेत. आर्यन खानची मुक्तता करण्यासाठी वानखेडेंनी शाहरुख खानकडे 25 कोटी रुपये मागितले होते, शेवटी 18 कोटींना डील पक्की झाली होती, असं सीबीआयनं आपल्या एफआयआरमध्ये (FIR) म्हटलं आहे. वानखेडेंच्या वतीनं किरण गोसावीनं 50 लाखांचं आगाऊ पेमेंटही घेतलं होतं, असाही आरोप सीबीआयनं केला आहे. एवढंच नाही तर महागडी गाडी आणि हाय-फाय ब्रँड्सच्या कपड्यांबद्दल वानखेडेंनी नीट माहिती दिली नाही, तसेच परदेश दौऱ्याबद्दलही काही बाबी लपवून ठेवल्या असा सीबीआयला संशय आहे.  


What Is Aryan Khan Cruise Drugs Case : काय आहे आर्यन खान प्रकरण ? 


एनसीबीनं 2 ऑक्टोबर 2021 रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी पाच ग्रॅम मेफ्रेडॉन, 13 ग्रॅम कोकेन, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या आणि एक लाख 33 हजारांची रोकड जप्त केली होती. यावेळी एनसीबीनं या क्रूझवरून आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. यानंतर एनसीबीनं याप्रकरणी आर्यन खानसह अन्य आरोपींविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती. 


नंतर या प्रकरणात आर्यन खान याला निर्दोष सोडण्यात आलं होतं. त्यानंतर समीर वानखेडे यांच्या तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते, तसेच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही करण्यात आले होते.