Gunaratna Sadavarte On Naturam Godse: वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महात्मा गांधी (Mahtama Gandhi) यांचा मारेकरी असलेल्या नथुराम गोडसेबद्दल (Nathuram Godse) गुणरत्न सदावर्ते यांना पान्हा फुटला आहे. महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याचा आदारार्थी उल्लेख करून सदावर्ते यांनी त्यांच्यासोबत न्याय झाला नसल्याचे वक्तव्य केले आहे. त्याशिवाय, राज्यातून शरद पवार यांच्या विचारांचा व्हायरस निर्जंतुकीकरण करणार असल्याचे सदावर्ते यांनी म्हटले.


राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत सदावर्ते यांच्या संघटनेचे पॅनल उतरले आहे. त्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सदावर्ते यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. पत्रकार परिषद ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सोबतच नथुराम गोडसे यांचा फोटो देखील लावण्यात आला. 


नथुराम गोडसेबद्दल सदावर्ते काय म्हणाले?


सदावर्ते यांनी म्हटले की, मी गांधींच्या मतांशी सहमत नाही. मी नथुराम गोडसे यांचा फोटो डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवरायांसोबत लावला आहे. मी संविधानाचा अभ्यासक आहे. नथुराम गोडसे यांचा जो खटला चालला. त्यामध्ये नथुराम यांच्यासोबत न्याय झाला नव्हता. मी संविधानामध्ये PhD केली आहे. मी अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की गोडसे यांच्या मानवाधिकाराचे उल्लंघन झाले आहे. नथुराम गोडसे यांच्यावरील खटला हा मानवाधिकाराविरोधातील असल्याचे सदावर्ते यांनी म्हटले. नथुराम गोडसे इथून पुढे माझ्या चळवळीत असतील असेही त्यांनी म्हटले. 


शरद पवार व्हायरस निर्जंतुकीकरण रॅली काढणार 


पत्रकार परिषदेत बोलताना, गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवार यांच्यावर पातळी सोडून टीका केली. शरद पवार यांची लायकी आता सगळ्यांना कळली असल्याचे त्यांनी म्हटले.  शरद पवारांचा वैचारिक व्हायरस आहे. 
सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेऊन चैत्यभूमी पासून शरद पवार व्हायरस चे निर्जंतुकीकरण रॅलीला सुरुवात करणार असल्याचे सदावर्ते यांनी म्हटले. 


स्टेट ट्रान्सपोर्ट को. ऑपरेटिव्ह बँक शरद पवारांची आर्थिक नाडी आहे. पवारांमुळे एकदाही या कष्टकऱ्यांना अध्यक्ष पद मिळालं नाही. या निवडणुकीत आमचं पॅनल लढणार असून त्यात विजयी होईल, असंही त्यांनी म्हटले.   शिंदे सरकार आलं आणि पवारांच्या घरावरील हल्याच्या खोट्या गुन्ह्यात डांबलेल्या लोकांना पुन्हा नोकरी मिळाली असल्याचे त्यांनी म्हटले. पवार यांना धमकी कोण देणार असा प्रश्न करताना दाऊद हा कोणाच्या कार्यकाळात वाढला असा सवाल त्यांनी केला. 


महाराष्ट्रात नोव्हेंबर 2021 ते मार्च 2022 च्या दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणासह विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं होतं. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्त्व भाजप आमदार गोपीचंद पडळकर, रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केलं होतं. तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारने मागण्यांबाबत चर्चा केल्यानंतर  गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी एसटी संपातून बाहेर पडण्याची भूमिका घेतली. यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं नेतृत्त्व गुणरत्न सदावर्ते यांनी केले. त्यावेळी एसटी महामंडळाचे विलिनीकरण होईल अशी आशा त्यांनी दाखवली होती. मात्र, एसटी महामंडळाचे विलिनीकरण झाले नाही. राज्यात सत्तांतर झाल्यानंतरही विलिनीकरणाची मागे पडली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना पगारासाठी प्रतीक्षा करावी लागली. एसटी संपानंतर सदावर्ते यांनी आपली एसटी कामगार संघटना सुरू केली आहे.