Maharashtra Maratha Reservation Updates: राज्यभरात (Maharashtra News) मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना आज मुंबईतील (Mumbai News) सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आलेली. बैठकीला सत्ताधाऱ्यांसोबत विरोधी पक्षांमधील अनेक मंत्री उपस्थित होते. परंतु, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) मात्र बैठकीला अनुपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला लावलेली त्यांची खुर्ची ही रिकामीच ठेवलेली पाहायला मिळाली. अशातच संभाजीराजे छत्रपतींनी मराठा आरक्षण प्रश्नी बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घातल्याची माहिती मिळत आहे. संभाजीराजे छत्रपतींनी स्वतः यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे. 


मुंबईतील आज सह्याद्री अतिथीगृहावर राज्य सरकारच्या वतीनं मराठा आरक्षण विषयावर बोलवण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीला छत्रपती संभाजीराजे अनुपस्थित होते. मराठा आरक्षणाबाबतची कोणतीही बैठक कधीही न टाळणारे छत्रपती संभाजीराजे आज पहिल्यांदाच बैठकीला अनुपस्थित राहिल्यानं चर्चांना उधाण आलं होतं चर्चेचा विषय ठरला होता. 


सर्वपक्षीय बैठकीत अनुपस्थित राहण्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी या बैठकीस पोकळ बैठक असं संबोधत राज्य सरकारसह सर्वपक्षीयांवर देखील मराठा आरक्षणापेक्षा प्रत्येकाला आपापली व्होट बँक सांभाळणं महत्त्वाचं वाटत असल्याचं टीकास्त्र सोडलं आहे. 


छत्रपती संभाजीराजे यांचे ट्वीट 






संभाजीराजेंनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, "मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे, राज्यात आत्महत्या होत आहेत, मराठा आंदोलन तीव्र होत आहे. तरीदेखील सरकार केवळ बैठकांचा खेळ करीत आहे. अशा बैठकांमध्ये वेळ न दवडता सरकारने ठोस पावले उचलावीत. केंद्र सरकारनेही केवळ बघ्याची भूमिका न घेता तात्काळ या विषयामध्ये लक्ष घालून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, हीच आमची अंतिम मागणी आहे."


"गेल्या पंधरा वर्षांपासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रिय असताना कोणत्याही सरकारने समाजासाठी बोलाविलेल्या एकाही शासकीय बैठकीस मी अनुपस्थित राहिलो नाही. दोन वेळेस आरक्षणही मिळाले होते मात्र मागील सरकारच्या घोडचुकांमुळे दुर्दैवाने मराठा आरक्षण रद्द झाले व समाजाचा लढा परत एकदा तीव्र झाला.", असं संभाजीराजे ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. 


"सध्या आरक्षणाच्या नावाने केवळ पोकळ बैठकांचे सत्र चालू असल्याचे दिसून येत आहे. यातून कोणताही मार्ग निघत नाही अथवा आरक्षण कसे देणार, किती कालमर्यादेत देणार याचा मार्गही सांगितला जात नाही. सर्वपक्षीय मंडळी देखील मराठा आरक्षणाला पाठिंबा देतात, बैठकांना येतात मात्र मार्ग सांगत नाहीत. मराठा समाजाला आरक्षण देणे यापेक्षा प्रत्येकाला आपापली व्होटबँक सांभाळणे अधिक महत्त्वाचे वाटत आहे.  त्यामुळे आजच्या बैठकीस मी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. समाज आता अशा बैठकांना भूलणार नाही, आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहील.", असं संभाजीराजे ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.