मुंबई : ऑपरेशन करताना दाढीला धक्का लावू नका, अशी मागणी मुंबई महापालिकेत समाजवादी पक्षाचे नगरसेवक रईस शेख यांनी अतिरिक्त आयुक्तांकडे केली आहे. रुग्णालयात मुस्लिम रुग्णांच्या शस्त्रक्रिया करताना संबंधित रुग्णांच्या कुटुंबीयांची परवानगी घेऊनच दाढी काढावी, अशी मागणी रईस शेख यांनी केली आहे. शेख यांनी तसं पत्र अतिरिक्त आयुक्तांना दिल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.


मुस्लिम धर्मीयांमध्ये प्रथा-परंपरा, रीतिरिवाजानुसार दाढी ठेवणे खूपच महत्त्वाचे आहे. त्यामुळे मुस्लिम समाजातील धर्मगुरु आणि पुरुष दाढी ठेवतात. मात्र महापालिकेच्या रुग्णालयात एखाद्या रुग्णावर जर शस्त्रक्रिया करायची असेल, तर त्याच्या किंवा त्या रुग्णाच्या कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय दाढी काढण्यात येऊ नये, अशी अजब मागणी शेख यांनी केली. रईस शेख हे भायखळ्यातून समाजवादी पक्षाचे नगरसेवक आहेत.

मुसलमान व्यक्तीने चेहऱ्यावरील दाढी काढणे हे मुस्लिम धर्मीयांच्या प्रथा-परंपरेच्या विरोधात आहे. त्यामुळे त्या मुस्लिम पुरुषाला आणि त्याच्या कुटुंबाला समाजात त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयात मुस्लिम रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्या रुग्णाची परवानगी घेण्यात यावी आणि त्यानंतर पुढील कृती करण्याचा निर्णय घेण्यात यावा, प्रशासनाकडून लवकरच याबाबत निर्णय घ्यावा, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, शेख यांच्या मागणीवरुन पालिकेत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. शेख यांनी अशी मागणी करुन अज्ञानाचं प्रदर्शन घडवल्याचा आरोप भाजप नगरसेवक मनोज कोटक यांनी केला आहे. वैद्यकीय क्षेत्रात छोट्यातल्या छोट्या ऑपरेशनमध्ये केस काढले जातात. जंतू संसर्ग होऊ नये, हा त्यामागचा उद्देश असतो. वैद्यकीय कामात धार्मिकता आणणे योग्य नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं.