मुंबई म्हाडाच्या घरातील आमदारांचं आरक्षण निम्म्यावर
एबीपी माझा वेब टीम | 04 Jan 2019 04:48 PM (IST)
मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या लॉटरीमध्ये आमदारांसाठी असलेल्या आरक्षणात निम्म्याने घट करण्यात आली आहे. त्यामुळे दोन टक्क्यांवर असलेलं आरक्षण आता एका टक्क्यावर आलं आहे.
मुंबई : मुंबईतील म्हाडाच्या घरातील सोडतीत आमदारांच्या आरक्षणात निम्म्याने कपात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या आरक्षणाचा क्रीडापटू आणि अनाथ अर्जदारांना लाभ होणार आहे. म्हाडाच्या घरांच्या सोडतीत आमदारांसाठी असलेल्या आरक्षणात 50 टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे दोन टक्क्यांवर असलेलं आमदारांसाठीचं आरक्षण एक टक्क्यावर आलं आहे. मुंबईत घरांच्या किंमती कमी केल्यानंतर म्हाडाचा मोठा निर्णय मानला जात आहे. 'म्हाडा'च्या या निर्णयाचा खेळाडू आणि अनाथांना फायदा होणार आहे. कारण हा कोटा आता खेळाडू आणि अनाथांसाठी राखीव असेल. नुकत्याच झालेल्या म्हाडाच्या सोडतीमध्ये 26 घरांसाठी 43 आमदारांनी अर्ज केला होता. शिवसेनेच्या तीन लोकप्रतिनिधींना यावेळी लॉटरी लागली होती. शिवसेनेचे शाखा प्रमुख विनोद शिर्के, नगरसेवक रामदास कांबळे आणि खासदार हेमंत गोडसे यांना कोट्यवधी रुपयांची घरं लागली होती. मुंबईत हक्काचं घर घेण्याचं एक हजार 384 जणांचं स्वप्न डिसेंबर महिन्यात 'म्हाडा'ने पूर्ण केलं होतं. मुंबई विभागातल्या घरांची वांद्र्यात सोडत झाली होती. तब्बल एक लाख 64 हजार अर्ज या घरांसाठी आले होते.