मुंबई: सलमान खान आणि त्याच्या कुटुबियांविरोधात सोशल मीडियावर केलेली वक्तव्यं ही बदनामीकारक आणि जातीय तेढ निर्माण करणारी होती, असा युक्तिवाद अभिनेता सलमान खानच्या वतीनं शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. पनवेल येथील सलमानच्या फार्महाऊस जवळच असलेल्या भूखंडाचे मालक केतन कक्कड यांनी एका यूट्युब चॅनलच्या माध्यमातून केलेल्या बदनामी विरोधात सलमाननं आता हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. अशा प्रकारच्या अपमानकारक व्हिडिओला ब्लॉक करत तात्काळ हटवून टाकावं, असे अंतरिम आदेश देण्याची विनंती करत सलमानने हायकोर्टात केली आहे. 


यापूर्वी सलमनाची हीच मागणी मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळून लावली होती, ज्याला आता सलमाननं हायकोर्टात आव्हान दिलं आहे. या व्हिडीओतील अन्य दोन जणांना प्रतिवादी करताना ट्विटर, फेसबुक, यूट्युब आणि गुगललाही सलमानने प्रतिवादी केलं होतं. या शुक्रवारी न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांच्यासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीत सलमानच्या वकिलांनी युक्तिवाद सुरू केला असून दिवसाचं कामकाज संपल्यानं या याचिकेवरील सुनावणी हायकोर्टानं 22 ऑगस्टपर्यंत तहकूब केली आहे.


सलमानची तुलना बाबर आणि औरंगजेबशी
कक्कड यांचा व्हिडीओ हा काल्पनिक असून केवळ बदनामीकारकच नाही तर सलमान खानविरोधात लोकांमध्ये जातीयदृष्ट्या तेढ भडकवणाराही आहे, असा दावा सलमानच्यावतीनं जेष्ठ वकील रवी कदम यांनी केला. तसेच अल्पसंख्याक समुदायाचा सदस्य असलेला सलमान त्याच्या फार्महाऊसजवळील गणेश मंदिर बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचंही कक्कड म्हणाले आहेत. एकीकडे अयोध्येत मंदिर उभाण्यासाठी 500 वर्षे लागली तर इथे सलमान खान एक गणेश मंदिर बंद करण्याचा प्रयत्न करत आहे असा उल्लेख करत कक्कड यांनी सलमानची तुलना थेट बाबर आणि औरंगजेबशी केल्याचा आरोप कदम यांनी केला. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर शेकडो लोकं सलमानविरोधात सोशल मीडियावर शेरेबाजी करत असल्याचंही त्यांनी कोर्टाला सांगितलं.


इतकंच नव्हे तर सलमान हा अंल्डरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या टोळीचा सदस्य असल्याचा दावा करत सलमान त्याच्या फार्महाऊसमधून अमली पदार्थ, अवयव आणि मुलांच्या तस्करीचा व्यवसायही चालवत असल्याचा आरोप कक्कड यांनी या व्हिडीओतून केल्याचं कदम यांनी युक्तिवाद करताना कोर्टाला सांगितलं.