मुंबई : मुंबई पोलिसांचे पगार एचडीएफसी बॅंकेत जमा होणार आहेत. एचडीएफसीने दिलेल्या प्रस्तावात पोलिसांना अधिक सुविधा मिळत असल्याने या बँकेची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलिसांना एचडीएफसी बँकेकडून आता लाखो नाही तर कोट्यवधींचं विमा संरक्षण मिळणार आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2015 साली अॅक्सिस बँकेत मुंबई पोलिसांचे पगार करण्याबाबत करार करण्यात आला होता. या कराराची मुदत 31 जुलै 2020 रोजी संपली आहे. त्यानंतर नवी बँक निवडण्यासाठी पोलीस दलाने प्रस्ताव मागवले होते. त्यामधून भरघोस ऑफर देणाऱ्या एचडीएफसी बँकेची निवड करण्यात आली.
मुंबई पोलीस आणि HDFC बॅंक यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला. यापुढे मुंबई पोलीस आणि मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचे पगार आता HDFC बॅंकेत जमा होणार आहेत. या प्रकियेसाठी मुंबई पोलिसांनी अनेक बँकांकडून प्रस्ताव मागवले होते त्यात HDFC बॅंकेने पोलीस खात्याला बम्पर ऑफर दिली आहे.
पोलिसांना एचडीएफसी बँकेकडून कोणत्या सुविधा मिळणार?
- 11 लाखांच्या विम्यासह कुटुंबियांतले पाच सदस्य झिरो बॅलन्स खातं उघडू शकतात
- नैसर्गिक किंवा कोविडमुळे मृत्यू झाल्यास 10 लाखाचे विमा संरक्षण
- अपघाती मृत्यू झाल्यास एक कोटींपर्यंत विमा कवच
- अपघातात अपंगत्व आल्यास 50 लाखांचं विमा कवच
- अपघाती मृत्यूनंतर दोन अपत्यांना 10 लाख शिक्षणासाठी
- रुग्णालयात उपचारांसाठी भरती झाल्यास 30 दिवसांपर्यंत प्रति दिन एक हजार रुपये मदत
2015 साली देवेंद्र फडणवीस यांच्या काळात हेच पगार अॅक्सिस बॅंकेत जमा व्हायचे. त्यावेळी मुंबई पोलीस आणि ॲक्सिस बँकेमध्ये करार झाला होता. या कराराची मुदत 31 जुलै 2020 रोजी संपली आहे. फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या अॅक्सिस बँकेत उच्च पदावर असल्याने 2015 साली सरकारने पोलिसांचे पगार या बँकेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप तेव्हा विरोधकांनी केला होता. आता पुन्हा एचडीएफसीसोबत करार केल्याने आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत
सध्या पोलिसांचे पगार असो किंवा सुशांत सिंह राजपूतचं प्रकरण मुंबई पोलीस चांगलेच चर्चेत आहेत. पण सणवार असो किंवा कोरोनासारखं संकट पोलीस कायमच ऑन ड्युटी 24 तास आहेत. दिवस-रात्र काम करणाऱ्या आपल्या पोलिसांनी विमा कवचही तितकंच महत्त्वाचं आहे. कधी कोणावर कोणती वेळ येते सांगता येत नाही. अशा वेळी बॅंकेने दिलेल्या सुविधांमुळे पोलीस खात्यात आनंदाचं वातावरण आहे.
Mumbai Police Salary Account | मुंबई पोलिसांचे पगार आता एचडीएफसी बँकेत होणार