मुंबई : सकल मराठा क्रांती महामोर्चाचं गेल्या 10 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू आहे. येत्या अधिवेशनात सरकारनं मागण्या मार्गी लावाव्यात अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलनकांकडून देण्यात आला आहे.


मराठा समाजासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वसतिगृह जुलै 2017 पर्यंत कार्यान्वित करण्यात येईल, असं आश्वासन देण्यात आलं होतं. परंतु दोन वर्षे उलटून गेली तरी याबाबत काहीच हालचाल झाली नसल्याचा आरोप आंदोलकांकडून होत आहे.


महाराष्ट्र सरकारनं लेखी आश्वासनं दिली, पण पाळली नाहीत. मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं काम या सरकारनं केलं आहे. मराठा समाजातील युवकांवर आंदोलनादरम्यान नोंदवलेले गुन्हे मागेही घेतले गेले नाहीत. हिंसक आंदोलनात ज्या तरुणांचा बळी गेला, त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देखील मिळालेली नाही, असा आरोप आंदोलकांनी केला आहे.


येत्या 26 नोव्हेंबरला मराठा संघटनेचा दुसरा गट मुंबईत आंदोलन करणार आहे. सकल मराठा मोर्चा या आंदोलनात सहभागी होणार नाही. मराठा समाजात फुट पाडण्याचं राजकारण मुख्यमंत्रीच करत असल्याचा आरोपही आंदोलनकांनी यावेळी केला. मात्र येत्या 16 तारखेपासून सकल मराठा क्रांती मोर्चा आझाद मैदानावर संयुक्त आंदोलन करणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.