वसई : वसईच्या समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद आढळलेल्या बोटीवरील खलाशाला अखेर 12 तासानंतर भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने रेस्क्यू करून सुरक्षित बाहेर काढलं आहे. रफिक शेख असे रेस्क्यू करून काढलेल्या खलाशाचे नाव आहे. बोटीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने बोट अद्याप समुद्रातच आहे. या बोटीला दुसऱ्या बोटीने बाहेर काढण्यात येणार आहे. सध्या खलाशी आणि मालकाला वसई पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु केली आहे.
वसईच्या भुईगाव आणि कळंब परिसरातील समुद्रात काल एक संशयास्पद बोट आढळली होती. भुईगाव परिसरातील 15 माईल्ड अंतरावर खोल समुद्रात ही बोट अडकली होती. खडकावर आदळून बोट समुद्रात अडकली असा अंदाज व्यक्त होतं होता. संशयास्पद बोट असल्याने सर्व शासकीय यंत्रणा कालपासून सतर्क झाल्या होत्या.
वसई पोलीस, कोस्टल गार्ड, मेरिटाईम बोर्ड यांच्याकडून संयुक्त कारवाही करून या बोटीचा तपास केला जात होता. आज सकाळी बोटीचा मालक राप्टर काळोखे हा व्यक्ती समोर आल्याने बोटीची ओळख पटली. ही बोट भाईंदरच्या उत्तन येथील असून स्टील लॉन्च करणारी ही बोट होती. काल सकाळी सातच्या सुमारास तिचा दोर तुटल्याने ती भरकटत वसईच्या भुईंगाव समुद्रकिनाऱ्यावर आली होती.
या बोटीत एक खलाशी अडकला होता. बोटीचा इंजिनचा भाग समुद्रातील खडकाला आदळल्याने इंजिनमध्ये बिघाड झालं होतं. आज सकाळी भारतीय तटरक्षकाच्या हॅलिकॉप्टरने बोटीवरील खलाशी रफिक शेखला सुरक्षित बाहेर काढून त्याला किनाऱ्यावर उतरवण्यात आलं. आता ही बोट काढण्यासाठी दुसऱ्या एका बोटीची मदत घेवून तिला बाहेर काढण्यात येईल. सध्या वसई पोलिसांनी मालक आणि खलाशी याला चौकशी ताब्यात घेतलं असून घटनेची सखोल चौकशी करत आहेत. हा खलाशी तब्बल बारा तासानंतर बाहेर आला.