मुंबई : नागरिकांनी झेब्रा क्रॉसिंगवरूनच रस्ता ओलांडायला हवा. या नियमाचा भंग करून पादचाऱ्यानं रस्ता ओलांडला त्यामुळे त्याच्या अपघाती मृत्यूस वाहनचालकाला जबाबदार धरता येणार नाही असं महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत मुंबई सत्र न्यायालयानं या प्रकरणातील दुचारीस्वार आरोपीला सदोष मनुष्यवधाच्या आरोपातून दोषमुक्त केलं आहे.


काय घडली होती घटना


ऑगस्ट 2017 रोजी एका 60 वर्षीय महिलेचा पूर्व द्रुतगती महामार्गावरील चेंबूर येथील कामराज नगर या परिसरात दुचाकीस्वाराची धडक लागल्याने मृत्यू झाला होता. अपघात झाल्यानंतर हेमंत हटकर या दुचाकीस्वाराने तिथून पळ काढला होता. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला. पुढे तपासाअंती एका होंडा एक्टिव्हा चालविणाऱ्या दुचाकीस्वाराने वृद्ध महिलेला धडक दिल्याचं उघड झालं आणि पोलिसांनी आरोपीला आयपीसी कलम 304 (अ) (बेदरकारपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत) आणि अन्य काही कलमातंर्गत गुन्हा नोंदवला होता. 


कोर्टाचा निकाल काय?


मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. पारवे यांच्यासमोर यावर सुनावणी पार पडली. तेव्हा, उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबावरून महामार्गावरील फुटपाथ हा घटनास्थळापासून 35 फूट लांब तर रोडवरील दुभाजक 15 फूट अंतरावर असल्याचे आढळून आले. त्यावरून ही महिला घटनेदरम्यान रस्त्याच्या मधूनच रस्ता ओलांडत असल्याचे सिद्ध होत असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावरील झेब्रा क्रॉसिंगच्या नियमांचा भंग करण्यात आला असून महामार्ग झेब्रा क्रॉसिंग असल्याशिवाय ओलांडू नये हे सर्वज्ञात आहे. तसेच अपघाताच्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग होते याबाबत कोणताही अधिकृत पुरावा सादर करण्यात आलेला नाही. तसेच महिलेचा मृत्यू हा या अपघातामुळेच झाल्याचे पुरावे पोलीस सादर करू शकले नाहीत. त्यामुळे आरोपीने सुसाट स्कूटर चालवल्यामुळे हा अपघात झाला असं जरी मान्य केलं तरीही त्याचा महिलेच्या मृत्यूशी थेट संबंध लावता येऊ शकत नाही, असे मत व्यक्त करत न्यायालयाने दुचारीस्वाराला या आरोपातून दोषमुक्त केलं.