मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रासह मुंबईत गेल्या अडीच महिन्यांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मुंबईत प्रामुख्याने कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ज्याकडे पाहिलं जातं त्या धारावी परिसरात रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. धारावीतल्या कोरोनाग्रस्त रुग्णांना आता याच परिसरात असलेल्या साई हॉस्पिटलचा आधार मिळालेला आहे.


आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून मुंबईतील धारावी झोपडपट्टीकडे पाहिलं जातं. या परिसरात तब्बल आठ लाखाहून अधिक नागरिक गेली अनेक वर्ष वास्तव्य करत आहेत. एका - एका खोलीत 10 ते 15 व्यक्ती राहत असून हा परिसर अनेक समस्यांच्या गर्तेत राहिलेला आहे. भारतातील विविध राज्यातील लाखो मजूर याच परिसरात राहून मुंबईतल्या विविध भागांमध्ये कामही करत आहेत.


कोरोनाने भारतासह महाराष्ट्रात प्रवेश केला आणि मुंबईसह धारावीतील झोपडपट्टीत याची अनेकांना लागण होत गेली. मुंबईतील इतर भागांपेक्षा धारावीमधल्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली होती. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या परप्रांतीय मजुरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. धारावीमध्ये प्रामुख्याने कष्टकरी, सर्वसामान्य मजूरवर्ग राहत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यासाठी या नागरिकांकडे तितकासा पैसा उपलब्ध नाही. अशा लोकांनी उपचार करायचे कुठे? असा प्रश्न यावेळी निर्माण झाला होता. मुंबई महानगरपालिका आणि काही स्वयंसेवी संस्थांनी याच वेळी धारावीतील कोरोनाबाबत सर्वे केला. धारावीतल्या रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे मुंबई महापालिकेनं धारावी इथल्या नाईंटी फिट रोडवर असणाऱ्या साई हॉस्पिटलच्या व्यवस्थापन समितीशी बोलून हे संपूर्ण हॉस्पिटल ताब्यात घेतलं आणि याच हॉस्पिटलमध्ये धारावी इथल्या रुग्णांवर उपचार सुरू केले.


मुंबई महापालिकेमार्फत ज्या नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह येतो अशाच नागरिकांना साई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे. या रुग्णांवर याच हॉस्पिटल मधील डॉक्टर खालीद शेख, डॉक्टर ज्ञानेश्वर वाघमारे यांच्यासह अन्य डॉक्टर्सची टीम उपचार करत आहे. साई हॉस्पिटल हे प्रशासनाच्या ताब्यात असल्यामुळे या हॉस्पिटलमध्ये कोरोना वर उपचार घेणाऱ्या नागरिकांना संपूर्ण उपचार मोफत देण्यात येत आहे. तसेच त्यांना दोन वेळचे जेवण, चहा - नाष्टा, सूप यासह इतर सकस व पौष्टीक आहार ही वेळेवर देण्यात येत आहे. गेल्या अडीच महिन्यात या हॉस्पिटलमधून 234 रुग्णांवर उपचार झाले असून अनेक रुग्ण डिस्चार्ज घेऊन आपल्या घरी परतलेले आहेत.


धारावीच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या साई हॉस्पिटलमध्ये स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजीही घेण्यात येते उपचारांबरोबरच त्यांचे मानसिक संतुलन सुस्थितीत राहावं यासाठी हॉस्पिटलमधील डॉक्टर विशेष प्रयत्न करत आहेत.


या रुग्णालयातून दररोज किमान दोन पेशंट ठणठणीत बरे होऊन, कोरोनाला हरवून आपल्या घरी परतत आहेत. घरी जाताना हे रुग्ण या हॉस्पिटल मधील डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, स्वीपर यांचे विशेष आभार मानून त्यांना नमस्कार करून हॉस्पिटलच्या बाहेर पडत असल्याचे चित्र पाहायला मिळतय. धारावीतल्या गोरगरीब, कष्टकरी जनतेला कोरोनापासून मुक्त करण्यासाठी धारावी मधीलच हे 'साई हॉस्पिटल ' एक आधार बनत आहे, असंच आपल्याला म्हणावं लागेल.


या दवाखान्यातील डॉ. खालिद शेख यांनी सांगितलं की, भारतामध्ये कोरोनाने प्रवेश केल्यानंतर महापालिकेने आमच्याशी संपर्क साधला होता. आम्ही कोणताही विचार न करता ताबडतोब कोरोनाबाधितांच्या उपचारांसाठी आपलं हॉस्पिटल देण्याचं मान्य केलं. धारावी परिसरात कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे या हॉस्पिटलला गर्दी होणार हे निश्चित होतं. मात्र महापालिका आयुक्त, त्यांची डॉक्टर टीम आणि तज्ञांनी नियोजन करून जेवढे बेड उपलब्ध आहेत तेवढे रुग्ण हॉस्पिटलमध्ये पाठवल्यामुळे आम्हाला त्यांच्यावर व्यवस्थित वैद्यकीय उपचार करता आलेत. गेल्या अडीच महिन्यांपासून आम्ही या परिसरातील रुग्णांवर योग्य उपचार करून त्यांना घरी पाठवत आहे. विशेष म्हणजे रुग्णांच्या सेवेसाठी असलेल्या डॉक्टर्स, नर्स व इतर कर्मचारी यांना आता पर्यंत कोरोना ची लागण झालेली नाही. आम्ही सर्वांचीच योग्य काळजी घेत असल्याची माहिती डॉक्टर खालिद शेख यांनी दिली आहे.


डॉक्टर ज्ञानेश्वर वाघमारे यांनी सांगितलं की, माझ्या सोबत अन्य पाच डॉक्टर टीम गेली अडीच महिने या हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. रुग्णांवर उपचार करत असताना आम्ही देखील योग्य काळजी घेत आहे. धारावीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मनात थोडी भीती आहेच. मात्र सकाळी जेव्हा हॉस्पिटलमध्ये आम्ही कामाला सुरुवात करतो त्यावेळी रुग्णसेवेत ही भीती विसरून जातो. रुग्णांचं मानसिक संतुलन बिघडू नये यासाठी आमची टीम विशेष काळजी घेत आहे. धारावीसारख्या हॉटस्पॉटमध्ये हे हॉस्पिटल अखंडपणे सुरू असून या हॉस्पिटलमधून रुग्ण बरे होऊन आपल्या घरी जात आहे. याचं खूप मोठे समाधान आम्हाला मिळत आहे, असं ते म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या : 


नाभिक समाजाचे प्रश्न शासनाकडे मांडणार : देवेंद्र फडणवीस


अंबरनाथमध्ये लॉकडाऊनमुळे बिस्कीट उद्योगाला फटका, कामगार गावाला गेल्याने उत्पादन 50 टक्क्यांवर


लॉकडाऊनदरम्यान पार्ले-जी बिस्किटांची जबरदस्त विक्री, 82 वर्षांचा विक्रम मोडला!


दिव्यांगासाठी राज्यातील पहिले कोविड-19 रूग्णालय; नवी मुंबई मनपाकडून अभिनव उपक्रम


गणोशोत्सवाबाबत सरकारचा निर्णय मान्य असेल, मुबंईतील गणोशोत्सव मंडळांची भूमिका