अंबरनाथ : एकीकडे लॉकडाऊनच्या काळात बिस्किटांची मागणी वाढलेली असताना दुसरीकडे बिस्किटांच्या उत्पादनावर मात्र मोठा परिणाम झाला आहे. कारण बिस्कीट उद्योगात काम करणारे कामगार गावी निघून गेल्याने बिस्किटांचं उत्पादन अर्ध्यावर आलं आहे.


आशिया खंडातली सर्वात मोठी एमआयडीसी असलेल्या अंबरनाथ एमआयडीसीत बिस्किटं तयार करणाऱ्या पार्ले-जीसह पाच ते सहा मोठ्या कंपन्या आहेत. या सगळ्या कंपन्यांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड परिसरातले अकुशल कामगार काम करायचे. लॉकडाऊन झाल्यानंतर कंपन्या बंद असतानाही मालकांनी या कामगारांना पगार दिला, मात्र अखेर कुटुंबियांच्या काळजीने या कामगारांनी मूळगावी जाण्याचा निर्णय घेतला.


लॉकडाऊनदरम्यान पार्ले-जी बिस्किटांची जबरदस्त विक्री, 82 वर्षांचा विक्रम मोडला!


यामुळे बिस्कीट उद्योगात कामगारांचा मोठा तुटवडा भासू लागल्यामुळे प्रचंड मागणी असतानाही उत्पादन मात्र अर्ध्यावरच आलं आहे. परिणामी मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागत असल्याचं बिस्कीट उत्पादकांचं म्हणणं असून यामुळेच केंद्र सरकारने आमचा जीएसटी 18 टक्क्यांवरुन 5 टक्क्यांवर आणण्याची मागणी बिस्कीट उत्पादकांनी केली आहे.


पार्ले-जीची आठ दशकांमधील सर्वाधिक विक्री
कोरोना व्हायरसमुळे लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक क्षेत्रांमधील कंपन्यांना नुकसान होत असलं तरी पार्ले-जी बिस्किटांची एवढी विक्री झाली आहे की मागील 82 वर्षांचा विक्रम मोडला आहे. पार्ले-जी हे 1938 पासूनच ओळखीचं नाव असून अनेकांचा आवडता ब्रॅण्ड आहे. पार्ले प्रॉडक्ट्सने पार्ले-जी बिस्किटांच्या विक्रीचे आकडे देण्यास नकार दिला. परंतु यंदाच्या मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात पार्ले-जी बिस्किटांची विक्री ही मागील आठ दशकांमधील सर्वाधिक ठरल्याचं सांगितलं.


केवळ पाच रुपयांचा पार्ले-जी बिस्किटाचा पुडा शहरातून आपापल्या गावाला परतणाऱ्या स्थलांतरित मजुरांसाठी संजिवनी देणारा ठरला. शेकडो-हजारो किमी पायपीट करणाऱ्या मजुरांच्या भुकेला आधार पार्ले-जी बिस्कीट होतं. काहींनी स्वत: खरेदी करुन खाल्लं तर काहींनी दुसऱ्यांसाठी मदत म्हणून बिस्किटं वाटली.