Sachin Vaze : 'जगाला गुड बाय म्हणायची वेळ आलीय', सचिन वाझेंचं व्हॉट्सअॅप स्टेटस!

एबीपी माझा वेब टीम Updated at: 13 Mar 2021 12:00 PM (IST)

Sachin Vaze Shocking WhatsApp Status : पोलीस आधिकारी सचिन वाझे यांची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांची क्राईम ब्रान्चमधून बदली देखील करण्यात आली आहे. आता सचिन वाझेंच्या व्हॉट्सअॅप स्टेटसनं खळबळ उडाली आहे.

sachin_waze

NEXT PREV

मुंबई : मनसुख हिरण मृत्यू प्रकरणानंतर उडालेल्या गोंधळामध्ये संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस आधिकारी सचिन वाझे यांची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांची क्राईम ब्रान्चमधून बदली देखील करण्यात आली आहे. आता सचिन वाझेंच्या व्हॉट्सअॅप स्टेटसनं खळबळ उडाली आहे. 'जगाला गुड बाय म्हणायची वेळ आलीय, आता माझ्याकडे पेशन्स नाहीत', अशा आशयाचं  व्हॉट्सअॅप स्टेटस सचिन वाझेंनी ठेवलं आहे. 


पोलिस अधिकारी सचिन वाझेंनी ठेवलेल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये म्हटलं आहे की,  2004 मध्ये त्यांना सीआयडीनं अशाच चुकीच्या पद्धतीनं अटक केलं होतं. माझ्या सहकारी कर्मचाऱ्यांनी मला फसवलं होतं. मात्र त्यावेळी माझ्याकडं 17 वर्षांच्या अपेक्षा आणि नोकरी बाकी होती आणि पेशन्स देखील होते.  मात्र आता माझ्याकडे ना 17 वर्षांचं आयुष्य आहे ना सहनशक्ती आहे ना नोकरी आहे. त्यामुळं जगाला गुड बाय म्हणायची वेळ आली आहे, असं सचिन वाझेंनी म्हटलं आहे. 
 
17 वर्षांपूर्वीही मला फसवण्याचा प्रयत्न केला होता, तो आता दुसऱ्यांदा होतं आहे. ही स्टोरी चुकीची आहे. या सर्व गोष्टी राजकीय दबावापोटी आणि मीडिया ट्रायलमुळं होत आहेत.  4 आणि 5 मार्च रोजी मी साऊथ मुंबईमध्ये होतो आणि मनसुख हिरण ठाण्यात होता आणि त्याची बॉडी मुंब्य्रात मिळाली, असंही वाझेंनी म्हटलं आहे.  


दरम्यान एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की,  सचिन वाझे यांचं स्टेटस वाचल्यानंतर मुंबई पोलिसांच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क केला आहे. त्यांना स्टेटस डिलिट करण्यास सांगितलं आहे. त्यांनी काही चुकीचं पाऊल उचलू नये यासाठी त्यांच्याशी वरिष्ठांनी संपर्क केला आहे.  


सचिन वाझेंकडून सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज 


एपीआय सचिन वाझेंकडून सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.  19 मार्च रोजी त्यांच्या या अर्जावर सुनावणी होणार आहे. काल वाझे यांनी ठाण्यातील सेशन कोर्टात  अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. 





वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात बदली
दरम्यान या प्रकरणात चर्चेत असेलेले पोलीस आधिकारी सचिन वाझे  यांची क्राईम ब्रान्चमधून बदली करण्यात आली आहे.  वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात बदली करण्यात आली आहे. काल रात्री पोलीस मुख्यालयातून सचिन वाझे यांच्या बदलीसंदर्भात आदेश काढण्यात आलेत. सचिन वाझे आतापर्यंत मुंबई गुन्हे शाखेत कार्यरत होते.


Sachin Vaze | सचिन वाझे यांची गुन्हे शाखेतून नागरी सुविधा केंद्रात बदली


मनसुख हिरण मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे चांगलेच अडचणीत आले आहेत. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी स्कॉर्पिओ गाडी सापडली होती, त्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा संशयास्पद मृत्यू झाला. विरोधी पक्षांनी हिरण यांच्या मृत्यूचा संशंय थेट सचिन वाझे यांच्यावर घेतला आहे आणि त्यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यावर आता राज्यातील राजकारण चांगलंच पेटलं आहे. 


कोण आहेत सचिन वाझे?



  • सचिन वाझे 1990 मध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून मुंबई पोलिसात ज्वाईन झाले होते. त्यांनी आतापर्यंत 63 एन्काऊंटर केले आहेत.

  • नुकतंच Republic TV चे संपादक अर्णब गोस्वामी यांना त्यांनी घरातून अटक केली होती. गोस्वामींच्या अटकेसाठी तयार केलेल्या टीमचं नेतृत्व सचिन वाझे यांनी केलं होतं.

  • सचिन वाझे करीब 13 वर्षांनंतर 6 जून, 2020 रोजी पुन्हा पोलिस फोर्समध्ये परतले आहेत. त्यांनी 2007 मध्ये मुंबई पोलिसातून राजीनामा दिला होता.

  • वाझे यांनी छोटा राजन आणि दाऊद इब्राहिमच्या अनेक गुंडांचा एन्काऊंटर केला आहे. एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा त्यांचे बॉस होते.

  • सचिन वाझेंसह 14 पोलिस कर्मचाऱ्यांना 2004 मध्ये सस्पेंड करण्यात आलं होतं. या सर्वांवर 2002 घाटकोपर ब्लास्टचा आरोपी ख्वाजा यूनिसच्या कस्टोडियल डेथचा आरोप होता.

  • सस्पेंशन काळ संपल्यानंतर नाराज होत त्यांनी 2007 मध्ये पोलिस फोर्सचा राजीनामा दिला.

  • 30 नोव्हेंबर 2007 रोजी त्यांनी मुंबई पोलिसांची नोकरी सोडल्यानंतर 2008 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता.

  • 2020 मध्ये कोरोना महामारीच्या काळात सचिन वाझे पुन्हा पोलिस फोर्समध्ये परतले.




Published at: 13 Mar 2021 12:00 PM (IST)

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.