Sachin Joshi Money Laundering Case : मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering Case) तसेच आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आलेल्या अभिनेता आणि उद्योगपती सचिन जोशी (Sachin Joshi) याला मोठा दिलासा मिळाला आहे. सचिन जोशी याला मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai Sessions Court) विशेष कोर्टानं याप्रकरणातून दोषमुक्त केलं आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपींना यापूर्वीच दोषमुक्त केलेलं असल्यानं सचिन जोशीचाही दोषमुक्तीचा अर्ज स्वीकारत असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं आहे. तसेच सचिन जोशीचा जप्त केलेला पासपोर्टही त्याला तातडीनं परत करण्याचे निर्देश कोर्टानं तपासयंत्रणेला दिले आहेत. 


सुमारे 22 हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंमल बजावणी संचनालयानं (ईडी) ओमकार ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा तसेच अध्यक्ष कमलकिशोर गुप्ता यांना अटक केली होती. ओमकार बिल्डर्सने येस बँकेतून घेतलेलं 440 कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याचेही आरोप ईडीनं यासर्वांवर ठेवले होते. या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप ठेवत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं सचिन जोशी यालाही अटक झाली होती. त्यानंतर कोरोना काळात अनेक महिने त्याला जेलमध्येच काढावे लागले.


दरम्यानच्या काळात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं सचिन जोशीला जामीन मंजूर केला होता. मात्र ईडीनं याविरोधात तातडीनं हायकोर्टात धाव घेत त्यावर स्थगिती मिळवली होती. मात्र त्यानंतर पुन्हा जामीनासाठी दाद मागणाऱ्या सचिन जोशीची याचिका स्वीकारत कोर्टानं त्याची जामीनावर सुटका केली होती. काही महिन्यांपूर्वी याप्रकरणातील मुख्य आरोपींची कोर्टानं दोषमुक्तता केल्यानं सचिन जोशीनंही त्याच धर्तीवर कोर्टाकडे दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता. जो न्यायाधीश एम.जी. देशपांडे यांनी मंगळवारी स्वीकारत असल्याचं जाहीर केलं.


ओमकार समुहाच्या तीन कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाने छापे


बांधकाम व्यवसायातील प्रतिष्ठीत समूह अशी ओळख असलेल्या ओमकार समुहाच्या माध्यमातून आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी सचिन जोशी याची चौकशी ईडीचे अधिकारी करत होते. याआधी काही दिवसांपूर्वी ओमकार समुहाच्या तीन कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाने छापे टाकले होते. तसेच ओमकार समुहात उच्च पदावर कार्यरत असलेल्या सदस्यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले होते. एकाचवेळी ओमकार समुहाशी संबंधित अनेक ठिकाणी छापे पडले होते.


सचिन जोशी नेमका कोण ?


गुटखा उत्पादक जे. एम. जोशी यांचा मुलगा अशीही सचिन जोशी याची एक ओळख आहे. तो पान मसाला, अत्तर, द्रव्य पदार्थ, दारू, गुटखा यांची निर्मिती करणाऱ्या जेएमजे समुहाचा प्रमोटर तसेच प्लेबॉय या रेस्टॉरंट आणि क्लब चेनच्या भारतीय फ्रँचायजीचा मालक आहे. काही वर्षांपूर्वी मॉडेल आणि अभिनेत्री उर्वशी सोबत लग्न करणारा सचिन जोशी हा विजय मल्ल्याचा गोव्यातील किंगफिशर नावाचा बंगला खरेदी केल्यामुळे जास्त चर्चेत आला होता.