मुंबई: शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून आज पुन्हा शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’मधून सरकारवर टीका करण्यात आली आहे. गोहत्याबंदी पाप असेल तर शेतकरी आत्महत्या हा सदोष मनुष्यवध आहे. त्यामुळे कोणावर गुन्हे दाखल करायचे याचा खुलासा करावा अशी मागणी ‘सामना’मधून करण्यात आली आहे.
सामनातील अग्रेलखातून आतापर्यंत कायम भाजपवर टीका करण्यात आली आहे. सेनेनं आज पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. त्यामुळे आता या टीकेला भाजप नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं आहे.
एक नजर ‘सामना’च्या अग्रलेखावर:
गोहत्या नको, शेतकरी आत्महत्या चालते!
गोहत्येचे ज्यांना पातक वाटते त्यांचे आम्ही अभिनंदन करतो, पण त्यांच्या राज्यात शेतकरी आत्महत्या करीत आहे त्याचे काय? अशावेळी शेतकरी आत्महत्या हा सदोष मनुष्यवध मानून कुणाला गुन्हेगार ठरवायचे, कुणाला जन्मठेप ठोठवायची आणि कुणाला फासावर लटकवायचे याबाबत खुलासे व्हायलाच हवेत!
गाय मारणाऱ्यांना उलटे लटकवून फाशी देऊ असे विधान छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी केले आहे. गुजरातमध्ये गोहत्या करणाऱ्यांना यापुढे जन्मठेपेची शिक्षाच भोगावी लागेल. गोमांसाची विक्री वा देवाणघेवाण करणाऱ्यांना ७ ते १० वर्षांच्या सक्तमजुरीची आणि १ ते ५ लाख रुपयांपर्यंत दंड करण्याची तरतूद गुजरात सरकारच्या नव्या कायद्यात करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये गोहत्या करणाऱ्यांचे हातपाय तोडू असे भाजप आमदारांनी जाहीर केले आहे.
गाईविषयी संपूर्ण हिंदू समाजाला एक ममत्व आहे, गाईला गोमातेचा दर्जा हिंदू समाजाने दिला आहे. ही आपली श्रद्धा असली तरी देशातील एका मोठ्या वर्गाचे अन्न हे गोमांस आहे. गोव्यात भारतीय जनता पक्षाचे राज्य आहे, पण तेथील मोठा समाज ‘बीफ’ खातो.
गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून फाशी देण्याची भूमिका गोव्याचे मुख्यमंत्री श्री. पर्रीकर घेऊ शकतील काय? बरं, तिकडे केरळमध्येदेखील पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने तर ‘‘भाजपला मत दिले तर ‘बीफ’चा मुबलक पुरवठा मतदारसंघात राहण्याबाबत काळजी घेऊ’’, असे आश्वासन दिले आहे. केरळमधील मल्लापूरम लोकसभा मतदारसंघात ही पोटनिवडणूक होत आहे. भाजपतर्फे एन. श्रीप्रकाश हे तेथे निवडणूक लढवीत आहेत. त्यांनी पत्रकारांशी बोलताना गोमांसासंदर्भात हे ‘खळबळजनक’ विधान केले.
महाराष्ट्रासारख्या राज्यांमधील शेतकऱ्यांची अवस्था इतकी दारुण व करुण झाली आहे की, स्वतःचे पोट भरायचे की पशुधन जगवायचे या विवंचनेत महाराष्ट्राचा शेतकरी आहे. भाकड गोवंशाचे काय करायचे याचेही व्यवहारी उत्तर मिळायलाच हवे. आम्ही त्यावर इतकेच सांगू शकतो की, शेतकऱ्यांचे भाकड पशुधन सरकारने विकत घेऊन त्यांच्यासाठी चारा छावण्या स्थापन करायला आमची हरकत नाही. गोवंशहत्या रोखायची असेल तर शेतकऱ्यांना जगवायला हवे, त्याला आर्थिकदृष्ट्या स्वाभिमानी व मजबूत करायला हवे.